Breaking News

महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली

वाझेंच्या लेटरबॉम्बवरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली आहेत, अशा शब्दांत जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.
दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतले. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंह यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतले. जगात सगळे पाहिले असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिले नसेल. हेही मुंबईने पाहिले. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यात बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. नंतर परमबीर सिंह यांचे पत्र येते. एका न्यायाधीशाची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आता वाझेचे पत्र आलेय, असे जावडेकर म्हणाले.
जावडेकर पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री 11 मार्चला सांगतात की, सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाही. वाझेला अटक झाल्यानंतर 14 मार्चला संजय राऊत म्हणतात, एका सक्षम तपास अधिकार्‍याला त्रास दिला जातोय. शेवटपर्यंत सचिन वाझेचे समर्थन करत होते. सचिन वाझे सत्य बोलेल की काय यासाठी त्याचे समर्थन सुरू होते. आता सचिन वाझेचे पत्र आलेय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितले, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढले जाऊ नये यासाठी दोन कोटी रुपये मागितले.
शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांनीही भेंडी बाजार पुनर्वसन योजनेतून 50 कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडूनदेखील दोन कोटींची मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती, पण जसे परब यांच्यावर आरोप झाले तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोलले जात आहे, असा आरोपही जावडेकर यांनी केला.
राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे प्रकाश जावडेकर या वेळी म्हणाले. जर तुम्ही या लुटीसाठी सत्तेत आला आहात, तर जनतेलादेखील आपली ताकद दाखवावी लागेल. ही आघाडी निवडून आलेली नाही. भाजप आणि शिवसेनेची आघाडी निवडून आली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार मोदींचा फोटो लावून जिंकून आले आहेत. महाविकास आघाडीचे चरित्र या सगळ्या प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी प्रकाश जावडेकर यांनी केली.
महाराष्ट्रात जे घडतेय ते योग्य नाही -फडणवीस
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख तसेच शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र गंभीर असून, महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्याच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, सचिन वाझे यांनी पत्रात लिहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना विचार करायला लावणार्‍या आहेत. पत्र वैगेरे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याची सीबीआय किंवा संबंधित यंत्रणेने चौकशी करावी. अशा प्रकारचे पत्र आल्यानंतर त्या संदर्भातील चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झाले पाहिजे. नीट चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे; अन्यथा डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही.
देशमुखांसह ठाकरे सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली ः मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या सुनावणी वेळी न्या. संजय कौल यांनी ’आरोप करणारा तुमचा (अनिल देशमुख) शत्रू नव्हता, उलट राइट-हॅण्डच (परमबीर सिंह) होता. त्यामुळे दोघांची चौकशी झालीच पाहिजे’ असे मत व्यक्त केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply