अलिबाग ़: प्रतिनिधी
जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 7 मार्चला सकाळी 10.30वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा पोवार आणि अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम उपस्थित राहणार आहेत.
करोना प्रादुर्भाव काळात लक्षवेधी योगदान देणार्या महिलांचा या वर्षी तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. करोना बाधितांवर उपचार करण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या डॉ. अपुर्वा सौरभ पाटील (अलिबाग), परिचारीका दक्षता योगेश चौगुले (मुरुड), सामाजिक कार्यातील योगदान निशा प्रकाश नायक, एसटी वाहक करुणा ठाकूर (रोहा), आरती राऊत (पोलीस कर्मचारी) या पाच जणींचा यंदा तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या वेळी अलिबागची गिर्यारोहक बालिका शर्विका म्हात्रे हिचा विशेष सत्कार केला जाणार असल्याचे अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे आणि सचिव समीर मालोदे यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने गेली 11वर्षे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. समाजात आदर्शवत काम करणार्या आणि प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याचे अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.