Breaking News

बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना लवकरच बंदिस्त गाळे; आमदार मंदा म्हात्रे यांची अधिकार्यांसमवेत बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत.  याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल , कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांजसह बैठक झाली. या वेळी मार्केटचा तयार करण्यात आलेला आराखडा सादर करण्यात आला असून लवकरच आवश्यक कार्यवाही पूर्ण करून सदर बांधकामास सुरुवात करणार असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सूचित केले. बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार मंदा म्हात्रे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. या मार्केट उभारणीसाठी आमदार  मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीचीही तरतूद करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांपासून बेलापूर ग्रामस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता लघु व्यवसाय करीत आहेत. व्यवसाय करताना ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीपासून कर आकार भरला असून आजपर्यंत नवी मुंबई महापालिकेचा कर भरणाही केला आहे, असे असतानाही  नवी मनपाकडून ग्रामस्थांच्या दुकानांवर तोडक कारवाई केली गेली. अशा अधिकृत ग्रामस्थ दुकानदारांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याने अधिकृत गाळेधारकांना बंदिस्थ गाळे मिळावे व त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करून महापालिका आयुक्त यांजकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आयुक्तांनीही सकारात्मक निर्णय घेऊन गाळेधारकांना 9 x 6 आकाराचे बंदिस्थ गाळे वितरीत करण्याचे आश्वासन दिले होते. शहर अभियंता व संबंधित अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली असून लवकरच मार्केट उभारून पात्र गाळेधारक ग्रामस्थांना गाळे वितरीत करण्यात येतील. या मार्केट उभारणीसाठी माझा आमदार निधी दिला असून आणखी निधी लागल्यास अतिरिक्त निधीची तरतूद करेन, असे आ. म्हात्रेंनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply