खालापूर : प्रतिनिधी
शहराच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आलेली स्वागत कमान मधोमध वाकली असून कमानीवर बसवलेल्या लाद्या व शोभेच्या वस्तू खिळखिळ्या होऊन जमीनीवर कोसळत आहेत. या कमानीवरील दोन लाद्या गुरुवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता खाली रस्त्यावर कोसळल्या. खोपोली नगर परिषदेने 25 लाख रुपये खर्चून 10 वर्षा पुर्वी खोपोली शहराच्या प्रवेद्वारावर स्वागत कमान उभारली आहे. मागील काही वर्षापासून ही स्वागत कमान काही अंशी वाकली आहे. कमानीवर लावलेल्या लाद्या व शोभेच्या वस्तू कामानीपासून सुटल्या असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. गुरुवारी खोपोलीत आठवडा बाजार भरतो. या बाजारात खरेदी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकामची गर्दी असते. तसेच गणेशोत्सव असल्याने गुरुवारी खोपोलीत महिलांनी विशेषतः आदिवासी महिलांनी खरेदीसाठी तुडुंब गर्दी केली होती. याच वेळेस सकाळी दहा वाजता स्वागत कमानीचा काही लाद्या रस्त्यावर पडल्या. या वेळी जागरूक नागरिक व रिक्षाचालकांनी प्रसंगावधान दाखवून लहान मुले व आदिवासी महिलांना बाजूला केल्याने दुर्घटना टळली.