Breaking News

मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा : चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधी
तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी
(दि. 5) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारला दिला.  
या वेळी मराठा आरक्षणावरून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आरक्षण देणे हा केंद्राचा नाही, तर राज्याचा विषय आहे, मात्र यापुढे आता केंद्राला त्याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय होता. तामिळनाडू सरकारने स्वत: आरक्षण दिले. तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, मात्र त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का? तामिळनाडू सरकार केंद्राकडे गेले नव्हते. इतर राज्यांनी आपल्या ताकदीवर आरक्षण दिले आणि टिकविले. याप्रमाणे राज्य सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकविले पाहिजे. केंद्राचा रोल केवळ 10 टक्के आरक्षणाशी संबंधित आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
याबरोबरच आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, मात्र याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता, तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत कन्व्हिन्स केले होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळाले आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली, मात्र हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply