Breaking News

मालमत्ता कर कमी करा

नवीन पनवेल भाजपची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी नवीन पनवेलमधील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची शुक्रवारी (दि. 5) भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी मालमत्त कर कमी करण्याची विनंती करण्यात आली.  
कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. अनेक व्यापार्‍यांचा व्यापार बंद पडला अथवा मंदावला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर मालमत्ता कराचा प्रचंड आर्थिक बोजा पडणार असल्याने पनवेल महापालिकेच्या प्रभाग ‘ड’च्या सभापती सुशीला घरत आणि प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी   महापालिका उपायुक्त वंदना गुळवे आणि श्री. मानकामे यांची महापालिकेत भेट घेऊन त्यांना मालमत्ता कर कमी करण्यासाठी निवेदन दिले. या वेळी भाजप कार्यकर्ते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे उपस्थित होते.
पनवेल महापालिका स्थापन करताना पूर्वीच्या सिडको हद्दीतील क्षेत्राचा त्यामध्ये सहभाग करण्यात आला. नवीन पनवेल क्षेत्र हे सिडको वसाहत असून पनवेल महापालिकेकडे येथील फक्त आरोग्य सुविधा हस्तांतरित करण्यात आली आहे. इतर सुविधा आजही सिडको पुरवत असून, त्याचा कर सिडको वसूल करीत आहे. पनवेल महापालिकेने या भागात प्रस्तावित मालमत्ता कर हे 2016पासून भरण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी कर आकारणी भरावी लागणार आहे.
महापालिकेने कर आकारणी करताना सोसायटीचे कार्यालय, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांची जनसंपर्क कार्यालय व रखवालदार केबिनलाही व्यावसायिक कर लावला आहे. येथे कोणताही व्यवसाय केला जात नसल्याने त्याला निवासी कर लावणे आवश्यक असल्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. ओपन टेरेसला मालमत्ता करातून वगळण्यात यावे, सेक्टर 13, 14, 17 आणि 18 या सिडकोनिर्मित वसाहती अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असल्याने त्यांना मालमत्ता करात सवलत देण्यात यावी, मालमत्ता कराची पावती वीज बिलाप्रमाणे करदात्याला देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply