नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण सुरू असताना काही राज्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीची माहिती दिली. या वेळी त्यांनी महाराष्ट्राबाबत आम्ही चिंतेत आहोत, असे नमूद केलेे. देशात गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत कोरोनाचे 22,854 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 13,659 रुग्ण महाराष्ट्रातील आहे. म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान, आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट आहे. हा कोरोनाच्या नव्या स्टेनचा परिणाम नाही, तर बेजबाबदारपणाच यासाठी कारणीभूत आहे.
राज्यात एक लाख अॅक्टिव्ह रुग्ण
देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही एक लाखाच्या वर गेली आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आम्ही या राज्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्व राज्यांनी आता कंबर कसून मैदानात उतरावे, असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.