मुंबई : प्रतिनिधी
कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या (38 चेंडूंत नाबाद 81 धावा) बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत हरियाणाचा आठ गडी आणि 26 चेंडू राखून धुव्वा उडवला.
वानखेडे स्टेडियमवर हरियाणाचे सलामीवीर हर्षल पटेल (33) आणि शिवम चौहान (28) यांनी 66 धावांची भागीदारी रचून दमदार सुरुवात केली. त्यानंतर हरियाणाला 20 षटकांत 5 बाद 153 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर जय बिश्त (13) आणि आदित्य तरे (39) बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवने 38 चेंडूंत 11 चौकार व तीन षटकारांसह नाबाद 81 धावा केल्या. मुंबईने 15.4 षटकांतच लक्ष्य गाठले.