उरण : वार्ताहर
सेव अवर बीच ही संस्था गेली तीन वर्षे उरणच्या पीरवाडी समुद्र किनार्यावर स्वच्छता अभियान राबवित असते, परंतु या वेळी कोरोनाचे जागतिक संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी स्वच्छता अभियान राबविता आले नसल्याने समुद्र किनार्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. म्हणून सेव अवर बीच, श्री छत्रपती सामाजिक संस्था कोप्रोली, नवपरिवर्तन संस्था, खुशिया फाऊंडेशन (मुंबई) या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सेव अवर बीचच्या या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्वच्छता अभियानास विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अभियानात प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई येथील खुशिया फाऊंडेशन आणि लिमका बुक रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त बीच वॉरियर्स या संस्थेचे संस्थापक चिनु क्वात्रा आणि त्यांची टीम उपस्थित होती.
सेव अवर बीच या संस्थेच्या वतीने भूमिका सिंग, हर्षल धायफुले, आर्यन घरत, अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर, स्मिता नाखवा, समाजसेवक संतोष पवार, मुंबईस्थित खुशींया फाऊंडेशन अणि बीच वारीयर्स या संस्थेचे संस्थापक चिनु क्वात्रा अणि त्यांची टीम, नवपरिवर्तन या संस्थेकडून शेखर म्हात्रे, हर्षल ठाकूर, रमेश म्हात्रे, इतजार ठाकूर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुदेश पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल ममताबादे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. विघ्नेन इंटरप्रायजेसचे अनिकेत ससे यांनी सर्वांसाठी नाष्टापाण्याची सोय करून हातभार लावला.
साफसफाई करून जमा झालेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कचरा साफ करताना अनेक सिगारेटची पाकिटे, 100 हुन जास्त दारूच्या बाटल्या जमा झाल्या होत्या. त्याचीही विल्हेवाट लावण्यात आली. साफसफाई नंतर समुद्रकिनारा साफ व सुंदर झाला. पीरवाडी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी सदर कामाचे कौतुक केले. उरणमधील विविध सामाजिक संस्थांकडून या कामाचे कौतुक होत असून या स्वच्छता अभियानामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागला आहे.