Breaking News

उरणमधील बेपत्ता मच्छीमार बोट अखेर सापडली

उरण : वार्ताहर

पाच दिवसांपासून खोल समुद्रात बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर मासेमारी करण्यासाठी गेलेली 16 खलाशी असलेली आणि बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर मुंबईपासून अरबी समुद्राच्या 13 तासांच्या अंतरावर सापडली आहे. नेव्ही, कोस्टगार्डच्या मदतीने बोट आणि खलश्यांना सुरक्षितपणे मुंबईच्या बंदरात आणण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील करंजा वैष्णवी माता मच्छीमार संस्थेची ’मास्टर ऑफ किंग’ ही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. 16 खलाशी असलेली ही बोट पाच दिवसांपूर्वी खोल समुद्रात मासेमारी करणार्‍यासाठी निघाली होती. मुंबईपासून 13 तासांच्या अंतरावर खोल समुद्रात असताना बोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. इंजिनमधील झालेल्या बिघाडामुळे बोट पाण्याच्या प्रवाहासोबत भरकटत वाहत गेली. याच दरम्यान, बोटीवरील जीपीएस आणि वायरलेस सिस्टीमसुद्धा बंद पडली. यामुळे संपर्क तुटल्याने बोटीवरील खलाशांच्या अडचणीत वाढ झाली. मात्र एका वायरलेस मॅसेज मयंक वायरलेस कंपनीकडे पाठविण्यात यश मिळाले.

बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छीमारी बोट बंद पडली असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुसर्‍या बोटीच्या मदतीने बोटीचा शोध घेण्यात येत होता, मात्र  शोधानंतरही त्यांना बोटीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर मच्छीमार संस्थेच्या अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बेपत्ता बोटीची माहिती मत्स्यव्यवसाय, एमआरपीसी विभागालाही दिली. त्यांनी बेपत्ता बोटीचा नेव्ही, कोस्टगार्ड यांना शोध घेण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला अनुसरून हेलिकॉप्टरच्या मदतीने अरबी समुद्रात शोध घेत असताना मुंबईपासून सुमारे 13 तासांच्या अंतरावर मच्छीमार बोट सुरक्षित असल्याचे आढळून आली. सुरक्षित आणि सुखरुप सापडलेली मच्छीमार बोट आणि त्यावरील 16 खलाशांना मुंबईच्या ससूनडॉक बंदरात सोडण्यात आले आहे, अशी माहिती वैष्णवी माता मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी दिली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply