सुधागड ः रामप्रहर वृत्त
सोशल माध्यमाचा कोणी कसा वापर करेल याचा काही नेम नाही, परंतु सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर याने चक्क व्हॉट्सअॅपवरून कलिंगडे विकली आहेत. यातून त्याने भरघोस उत्पन्नदेखील मिळविले आहे. तुषार केळकर याने आपल्या शेतातून जवळपास 300 कलिंगडांचे उत्पादन घेतले आहे. एवढा माल चांगल्या भावाने विकावा कसा, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. कारण दलाल व व्यापारी अतिशय पडून भाव देत होते. मग तुषारने विविध व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फेसबुकवर आपल्या कामाची व कलिंगडाची माहिती पोस्ट केली. त्यामध्ये त्याने तुम्ही ऑर्डर द्या. माल तुम्हाला घरपोच मिळेल. कलिंगडाची किंमत साधारणपणे 30, 50, 70 आणि 100 रुपये अशी आहे, असे नमूद केले होते. बघता बघता अनेकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तहसीलदार दिलीप रायन्नावार, वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्यापासून अनेक मान्यवर आणि नागरिकांनी तुषारकडून कलिंगडे खरेदी केली. सध्या त्याच्याकडील सर्व मोठी कलिंगडे विकली गेली असून, उर्वरित कलिंगडांसाठीदेखील विचारणा होत आहे.
कलिंगड विक्रीसाठी मी पाली विभागातील काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट टाकली. मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी गेली सहा वर्षे गावी सेंद्रिय शेती करतो व माती-बांबूची घरे बांधतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. माझ्याकडे गेल्या सहा वर्षांत 32 देशांतून 200पेक्षा जास्त लोक प्रशिक्षण घेऊन गेले आहेत.
-तुषार केळकर, प्रयोगशील तरुण, उद्धर, ता. सुधागड