मुंबई ः प्रतिनिधी
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेल्या सचिन वाझे यांना आणखी एक झटका बसला आहे. वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांची कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आल्यानंतर वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर एनआयएने वाझे यांची 13 तास मॅरेथॉन चौकशी करीत शनिवारी रात्री अटक केली होती. यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी होत होती.
अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आलेला असून, हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे, मात्र स्फोटके ठेवणे त धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात, असा संशय असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी (दि. 15) वाझे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
‘पडद्यामागचे सूत्रधार कोण’
मुंबई ः एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या असताना राजकीय वर्तुळातदेखील या विषयी चर्चा सुरू आहेत. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी तर या प्रकरणी पडद्यामागचे सूत्रधार कोण आहेत, असा सवाल करून सत्य समोर यायला हवे, असे म्हटले आहे.
मनसुख हिरेन यांचा मुंब्र्यातील रेतीबंदर येथे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नावही आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता भाजप नेते शेलार यांनी या एन्काऊंटर स्पेशल अधिकार्याने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का?, त्याही प्रकरणात मीडिया हाऊसकडून वसूली केली होती का?, कुणाच्या जोरावर मीडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?, कोण आहेत पडद्यामागचे सूत्रधार, असे अनेक सवाल ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीत भूकंपाची शक्यता आहे. राज्याच्या गृहखात्याची धुरा अनिल देशमुख यांच्याकडून काढून घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वाझे प्रकरणात गृहखात्याची आणि सरकारची अडचण होत असल्याने शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे, तसेच देशातील सर्वांत सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे आता कारवाईची कुर्हाड नक्की कुणावर चालणार मुंबई पोलीस आयुक्तांवर की, गृहमंत्र्यांवर, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …