Breaking News

पनवेल मनपाचा 772.77 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचा सन 2020-21चा  सुधारित व 2021-22चा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 15) आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना सादर केला. हा अर्थसंकल्प 772.77 कोटी रुपयांचा आहे. स्थायी समितीच्या सदस्यांना त्याचा अभ्यास करून चर्चा करता यावी यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आली. या सभेस नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, संतोषी तुपे आदी सदस्य  उपस्थित होते. या वेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना 772.77 कोटी रुपयांचा सन 2020-21चा सुधारित व 2021 -22 चा अर्थसंकल्प हस्तांतरित केला. अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी यात महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले.
1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेली पनवेल महापालिका पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने 2020-21मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहे तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सूचविण्यात आलेली नाही.
पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय या अंदाजपत्रकात घेण्यात आले आहेत. याचबरोबर महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणार्‍या उद्याने, दैनिक बाजार व खुल्या जागा यांची विकासकामे हाती घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 52 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर इमारती दुरुस्ती, बांधकाम, यांच्यावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे.
महापालिकेची प्रशासकीय इमारत स्वराज्य या मुख्यालयाचा विकास, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 28 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठी नियमानुसार भरीव तरतूद यामध्ये करण्यात आली आहे, तसेच वेटलॅण्ड, मॅन्ग्रुव्हस जमिनीचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आलेली उद्याने आणि खेळांची मैदाने यांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज पनवेल महापालिकेचा सन 2020-21चा सुधारित व 2021-22चा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर केला. सदस्यांनी त्यावर चर्चा करण्यापूवीर्र् आम्हाला त्याचा  अभ्यास करू द्या, अशी मागणी केली. त्यामुळे आजची सभा स्थगित करण्यात आली.
-संतोष शेट्टी, अध्यक्ष, स्थायी समिती, पनवेल महानगरपालिका

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply