Breaking News

घनकचरा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांचा पत्रकार परिषदेत दावा

पेण : प्रतिनिधी

नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामकाज  प्रगतीपथावर असून, ते नियमानुसार सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसारच या कामाचा ठेका देण्यात आला असून, आजपर्यंत संबंधित ठेकेदाराला ठेक्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी बुधवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आरोग्य विभाग प्रमुख अंकिता इसाळ, आरोग्य निरिक्षक दयानंद गावंड उपस्थित होते.

 पेण नगर परिषदेचा 2 कोटी 53 लाखाचा डीपीआर शासनाने मंजूर केला आहे. त्यामधील सिव्हीलवर्क, कचरा गोळा करणे व कचर्‍याचे वर्गीकरण तसेच कचर्‍यावर प्रक्रिया करणे अशी वेगवेगळी कामे आहेत. शहरातील कचरा गोळा करणे, कचर्‍याचे वर्गीकरण करणे व कचर्‍यावर प्रक्रिया करणे ही तीन वेगवेगळी कामे असून, पेण नगर परिषदे तर्फे कचरा गोळा करण्यासाठी प्रभाग निहाय ठेके काढले आहेत. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्रपणे वेगळा ठेका काढलेला आहे, असे मुख्याधिकारी म्हणाल्या.

प्रकल्पाच्या सिव्हल वर्कचे काम पूर्ण झाले असून, त्यामध्ये प्रकल्पातील शेड, अंतर्गत रस्ता, गटार, कार्यालयाची इमारत, गेट, तारेचे कुंपण व वेब्रिज इत्यादि गोष्टींचा समावेश असून, त्यासाठी 62 लाख 26 हजार 966रूपये खर्च करण्यात आला आहे.

 घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी वेगळा ठेका देण्यात आला असून, त्यासाठी 950 रूपये प्रति टन दराने सदरचा ठेका श्री. बांदल यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये कचर्‍याचे वर्गीकरण करणे, ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून खत तयार करणे व सुक्या कचर्‍याची वेगळया प्रकारे विल्हेवाट लावणे इत्यादी कामे समाविष्ट असून सदर ठेकेदाराला तो ठेका नोव्हेबर 2018 मध्ये देण्यात आला आहे.

घनकचरा प्रकल्पावर ठेकेदाराचीच माणसे काम करीत असून नगर परिषदेचे कर्मचारी कडू यांची मुकादम म्हणून प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नगर परिषदेचे तीन कर्मचारी प्रकल्पाच्या बेलिंग मशीन व क्रशर मशीनवर काम करतात. सदर कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply