Breaking News

सुधागडातील गावे, वाड्या, वस्त्या अंधारात

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने तोडली पथदिव्यांची जोडणी

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील ग्राहकांकडे सुमारे साडेसहा कोटींची वीज बिल थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील 33ग्रामपंचायती आणि पाली नगरपंचायतीच्या पथदिव्यांची जोडणी तोडली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील 99 गावांसह वाड्या,वस्त्यांमधील रस्त्यांवर अंधार आहे. अशा वेळी मालमत्ता व जिविताच्या संरक्षणाचे दृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी केले आहे.

पथदिव्यांची देयके भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असतांना महावितरणने लाखो रुपयांचे बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना नोटीसा दिल्या आहेत. पण ही देयके भरणे ग्रामपंचायतला शक्य नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे निवेदन देण्यात येणार आहे, असे सिद्धेश्वरचे सरपंच उमेश यादव यांनी सांगितले. पथदिव्यांबरोबरच सध्या शाळा आणि पाणी वितरणाच्या जोडण्यादेखील तोडल्या जात आहेत, असेदेखील उमेश यादव यांनी सांगितले. दरम्यान, सुधागड तालुक्यातील सरपंच संघटना व प्रतिनिधींनी सोमवारी (दि. 15) पथदिव्यांची वीज जोडणी तोडू नये व पुन्हा जोडावी यासाठी पाली महावितरणला निवेदन दिले.

 पथदिवे बंद असल्याने रात्री सर्व गावात काळोख पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महावितरणने ताबडतोब पथदिव्यांची जोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी पाली ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच विजय मराठे यांनी केली आहे.

वीज बिल वसुली हा शासनाच्या अखत्यारीतला विषय व धोरणात्मक निर्णय आहे. वीज बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना कधीच फंड मिळत नव्हता.

-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

पाली परिसरात पथदिवे बंद आहेत. सर्वत्र अंधार होत असल्यामुळे रात्री गस्त घालताना अडचणी येत आहेत. सर्व ग्रामस्थ, व्यापारी संघटना, धार्मिक स्थळे व ज्वेलर्स दुकाने यांचे मालक व पदाधिकारी यांनी त्यांचे घर, दुकान व इमारतीसमोर किमान एक वीजेचा दिवा सुरू ठेवावा.

-विजय तायडे, निरीक्षक, पाली पोलीस ठाणे

थकीत वीज बिलांसदर्भात शासनाची धोरणे वेळोवेळी बदलत आहेत. महावितरणच्या मुजोर व दांडेलशाही कामामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.  या संदर्भात उग्र आंदोलन केले जाईल.

-अमित गायकवाड, अध्यक्ष, वंचीत बहुजन आघाडी, सुधागड तालुका

ग्रामपंचायतींना वीज बिल भरण्यागबाबत पूर्वसूचना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश उच्च स्तरावरून आले आहेत. बिल भरल्यानंतर जोडणी केली जाईल.

-जतीन पाटील, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, पाली-सुधागड

खालापुरात पाच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पावणे नऊ कोटींची वीज बिल थकबाकी

खोपोली : प्रतिनिधी

आज ना उद्या वीज बिलात सवलत मिळेल, थकबाकी माफ होईल या आशेवर असलेल्या पाच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे. थकबाकीची एकूण रक्कम पावणे नऊ कोटीच्या घरात आहे.

कोरोना संसर्गामुळे घरोघरी जावून मीटर रिडींग घेणे जवळपास चार महिने बंद होते. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले होते. रिडींग घेण्यास सुरूवात झाल्यानंतरही वीज बिलात घोळ असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नेहमीपेक्षा तिप्पट बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले होते. रिडींगनंतर योग्य बिल मिळेल, या भ्रमात असलेल्या ग्राहकांना भरमासाठ बिलाचा शॉक महावितरणने दिला. सध्या बिल वसुलीसाठी महावितरणाकडून तगादा लावण्यात येत असून, वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. खालापूर आणि चौक विभागात सुमारे पाच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामपंचायतींचादेखील समावेश असून तालुक्यातील नावंढे, कुंभिवली, चौक भागातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.त्यामुळे रस्ते अंधारात बुडाले आहेत.

सुधारणा असल्यास वीज बिले दुरूस्त करून देण्यात आली आहेत. एकरकमी बिल भरणे शक्य नसलेल्या अनेक ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिली आहे. ज्यांनी अजिबात बिल भरले नाही, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

-सचिन धनुधर्मी, अभियंता, महावितरण विभाग खालापूर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply