18 गावे, 57 आदिवासीवाड्यांसाठी आराखडा तयार
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून तेथील ग्रामस्थांनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, येत्या उन्हाळ्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई भासेल असे गृहीत धरून कर्जत तालुका पाणीपुरवठा कृती आरखडा तयार करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या उन्हळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला की, तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात. यावर्षी कर्जत तालुक्यात पाणीटंचाई भासणार्या गावे व वाड्यांना ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी 35 लाख 65 हजाराच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतारपाडा, गरुडपाडा, खांडस, ओलमण, चेवणे, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ आणि अंथराट, वरेडी या 18 गावांचा समावेश पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला आहे. तालुक्यातील आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, काटेवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूचीवाडी दोन्ही, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, तेलंगवाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हर्याचीवाडी, विकासवाडी, आषाने ठाकूरवाडी, नागेवाडी, जांभुळवाडी, वारे, बोरीचीवाडी, कळंब, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काळ्याचीवाडी, पाली धनगरवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, ठोंबरवाडी, कळकराई, बेकरेवाडी, माणगाववाडी, स्टेशन ठाकूरवाडी, नवसूचीवाडी, खाड्याचापाडा मधली वाडी, चाहूचीवाडी, दामत कातकरीवाडी आदी ठिकाणी मार्चपासून पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे.
पाणीटंचाई वर मात करण्यासाठी ट्रँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ट्रँकर सुरू केले जाणार आहेत. ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी 24.60 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी पाणीटंचाई निर्माण होण्याआधी चार गावे आणि 14 आदिवासीवाड्यांमध्ये बोअरवेल खोदल्या जाणार आहेत. त्यात चेवणे, बोंडशेत, खरवंडी आणि पोटल कळंबेपाडा या गावांचा तर फोंडेवाडी, बेलदारवाडी, बनाचीवाडी, खरवंडी आदिवासीवाडी, भिवपुरी कातकरीवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, मोरेवाडी, लाखाचीवाडी, ताडवाडी, ऐनवाडी, इंजिवली वरई, भोंबलवाडी आणि धाकटे वेणगाव येथे नवीन विंधण विहिरी खोदल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जुन्या 18 विंधण विहिरींची दुरुस्तीदेखील केली जाणार असून त्यासाठी 11 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.