नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांतील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलचे 14वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता ते अवघड वाटते. ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास 2500 कोटींचे नुकसान होईल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले होते की, हे सत्र मध्येच स्थगित केल्यामुळे आम्हाला 2000 ते 25000 कोटींचे नुकसान होऊ शकते. माझ्या माहितीनुसार 2200 कोटींचे नुकसान निश्चित आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत पाच वर्षांसाठी 16,347 कोटींचा करार केला गेला आहे. त्यानुसार प्रतिवर्ष तीन हजार 269 कोटी अशी किंमत होते. जर 60 सामने होतात, तर प्रत्येक सामन्याची राशी ही जवळपास 54 कोटी 50 लाख इतकी होते. आता 29 सामन्यांनुसार 1580 कोटी इतकी किंमत होते. अशात बोर्डाला 1690 कोटींचे नुकसान होणार आहे.
गांगुली म्हणाले की, अनेक फेरबदल करावे लागणार आहेत. अन्य बोर्डांशीही चर्चा सुरू आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी उर्वरित आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक गोष्टींवर विचार सुरू असून हळूहळू काम सुरू होईल, पण जर आम्ही आयपीएलचा दुसरा टप्पा घेण्यास अपयशी ठरतो, तर जवळपास 2500 कोटींचे नुकसान होईल.