Breaking News

निरर्थक मलमपट्टी

अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेसोबत पोलीस दलातील आणखी कोण कोण आणि किती जण सामील आहेत? मुंबई पोलिसांचे दल कार्यक्षमतेबद्दल देशातच नव्हे तर जगात लौकिक कमावून आहे. असे असताना काही सडके आंबे सगळीच आढी नासवत आहेत याची वेळीच दखल का घेतली गेली नाही? राज्याचे गृहखाते झोपा काढत होते काय? अशा असंख्य प्रश्नांची मालिका यामुळे सुरू झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या अटकेनंतरचा महाविकास आघाडी सरकारच्या नव्या गोंधळाचा तिसरा अंक आता सुरू झाल्याचे दिसते. राजकीय वरदहस्त लाभलेल्या, या साध्या एपीआय पदावरील कनिष्ठ अधिकार्‍यास निलंबनानंतर पुन्हा एकवार पोलीस दलात संधी मिळाली. नुसती संधी नव्हे तर सुवर्णसंधी मिळाली! त्याचा पुरेपूर दुरुपयोग त्याने केल्याचे आता तपासात उघड होत आहे. हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधार्‍यांना थोडी जाग आली. कोणी ना कोणी या प्रकरणी बळीचा बकरा बनणार याची चर्चा होतीच. त्याप्रमाणे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे आता मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला एनआयएने अटक केल्यानंतर त्याची रीतसर कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर नियमानुसार त्याचे पोलीस दलातून निलंबन झाले आहेच. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ वाझे याने स्वत:च पार्क केली होती. पीपीई किट पोशाख परिधान करून त्या गाडीची पाहणी करणारी अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसली होती. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून तो सचिन वाझेच होता असे आता उघड होत आहे. कनिष्ठ पदावर असूनही सचिन वाझे पोलीस मुख्यालयाच्या आवारातील आपल्या कार्यालयात मर्सिडिज मोटार घेऊन येत होता असेही तपासयंत्रणांच्या ध्यानात येत आहे. त्याच्या ताब्यातील ही मर्सिडिज कार एनआयएने ताब्यात घेतली असून त्या कारच्या डिकीमध्ये पाच लाख रुपयांची रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र आणि अन्य काही महत्त्वाचे पुरावे सापडले. एनआयएने अत्यंत कार्यक्षमतेने तपास चालू ठेवला असून दररोज वेगवेगळ्या धक्कादायक बातम्या ऐकू येत आहेत. या तपास कामामुळे मुंबई पोलीस आणि राज्याच्या गृहखात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुळात कनिष्ठ पदावर असूनही मर्सिडिज घेऊन कामावर येणार्‍या वाझेला त्याच्या वरिष्ठांनी वेळीच का छेडले नाही? वादग्रस्त सचिन वाझे याच्याविरुद्ध सर्वप्रथम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला. त्यानंतर बराच वेळ वाया गेला. हे प्रकरण गंभीर वळणावर येऊन ठेपल्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. सुशांतसिंह राजपूत प्रकरण, कंगना राणावत प्रकरण, अर्णव गोस्वामी यांच्या अटकेची कारवाई, कथित टीआरपी घोटाळा या सार्‍या प्रकरणांमध्ये परमबीर सिंह यांनी सत्ताधार्‍यांना अनुकूल अशीच पावले उचलली. तरीही त्यांची गच्छंती व्हायची ती झालीच. बैल गेला आणि झोपा केला अशातला हा प्रकार आहे. वरवरची ही मलमपट्टी आता निरर्थक वाटते कारण मुळात कारवाईलाच अक्षम्य उशीर झाला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply