नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळाच्या स्थापनेस बुधवारी (दि. 17) 51 गौरवशाली वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सिडकोची आजवरची यशस्वी कारकीर्द व सिडकोतर्फे यशस्वीरित्या हाताळण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प यातूनच सिडकोचे नगरविकास क्षेत्रातील अतुल्य योगदान दिसून येते.
सिडकोच्या नगरविकासातील योगदानामुळे सिडकोचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आदराने घेतले जाते. सिडकोने अनेक महत्त्वाकांक्षी तसेच लोकोपयोगी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करत जनमानसात विश्वास संपादन केला आहे. सर्वांगीण प्रगती हेच आता सिडकोचे ध्येय असून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसोबतच सर्वसामान्यांचा विकास हेच सिडकोचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले.