Breaking News

ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीचे प्रयत्न त्रोटकच

अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन आणि ब्राझिलच्या जंगलात लागलेली आग अनेक महिने पेटत राहिली आणि त्यामुळे होणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगची चर्चाही जगभर झाली. तापमानवाढीच्या या समस्येचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर सर्वत्र अनुभवण्यास मिळत असताना त्याबाबत जागतिक स्तरावर कधीही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण पातळीवरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रयत्न शक्य असताना त्यासाठीदेखील कधी प्रयत्न झालेले पाहण्यास मिळत नाहीत. त्यामुळे वणवे, तरवे आणि त्यामुळे होणार्‍या तापमानवाढीचा उच्चांक नियंत्रित ठेवता येत नाही. परिणामी, वनसंपदेसह नागरि वस्त्यांपर्यंत या तापमानवाढीचा परिणाम जाणवू लागला आहे. दारिद्य्राचे दृष्टचक्र या अर्थशास्त्रातील संकल्पनेप्रमाणे हे ग्लोबल वॉर्मिंगचेही दृष्टचक्र दिसून येऊ लागले आहे. पुर्वी डोंगररानातील गवत गुरांसाठी चारा, लाकूडफाटा इंधन म्हणून आणणारी ग्रामीण भागातील लोकं आता गुरे नसल्याने रानात गवत कापायला जाईनाशी झाली आहेत तर गॅस आणि निर्धूर चुलीमुळे लाकूडफाटा तोडून आणण्यास कंटाळा करीत आहेत. परिणामी, गवतावर गवत घासून पेटणार्‍या आगीलाही कोणीतरी बिडीकाडी टाकल्याचा आळ घेऊन नैसर्गिक वणव्याला मानवी कृत्य ठरविण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. हिरवे गवत वाढते, उन्हामुळे सुकते, घर्षणामुळे पेट घेते ही प्रक्रिया जणू चक्रानुक्रमे सुरू आहे. सीतामाई आणि प्रभूरामचंद्र दंडकारण्यातून दख्खनच्या पठारापर्यंत जाताना पाऊलवाटेने चालणार्‍या सीतामाईंच्या पायामध्ये एक काटा रूतला आणि रागाने सीतामाईंनी ’जळो हे कोकण’ असे त्राग्याने उदगार काढले सीतामाईंच्या सात्विकपणामुळे हा शाप खरा ठरला आणि हिरवेगार कोकण अचानक पेट घेऊ लागले. प्रभूरामचंद्रांना यावेळी सीतामाईंच्या त्राग्याची जाणीव झाली आणि त्यांनी विनंती केली, काटा पायात रूतण्याने संपूर्ण कोकण बेचिराख होण्याचा शाप योग्य नसून कोकणाला उशाप दे, त्यानुसार सीतामाईंनी ’जळो पण पुन्हा बहारो’ असा उशाप दिला आणि हे पौराणिक काळापासून ग्लोबल वॉर्मिंगचे दृष्टचक्र सुरू झाले. दुसरीकडे कोकणातील ग्रामीण भागात चैत्रपालवी फुटण्यासाठी पुर्वीच्या मोठ्या पानांची आणि छोट्या फांद्यांची तोड करून छाटलेली पानं व फांद्यांना शेतात राब पेटवून जमिनीची मशागत केली जात आहे. शेतीच्या मशागतीसाठी झाडांच्या नव्या फांद्या आणि पानांची कवळं काढून त्याचे शेतजमिनीवर राब पेटवून शेतीची मशागत करण्याची ही पारंपरिक पद्दत पोलादपूर तालुक्यात सर्वत्र रूढ झाली आहे. मात्र यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे शेतजमिनीच्या मातीमध्ये नवीन पिकाच्या वाढीसाठी निर्माण होणारे सिलीकॉनीयस गुणधर्म असलेले पोषक द्रव्य संपूर्ण जळून जात असल्याचे आधुनिक कृषी तंत्रज्ञान सांगते. पोलादपूर तालुक्यात सध्या कवळं काढून राब पेटविण्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. अनेक शेतांमध्ये शेण, फांद्या, पानं असा राब अंथरला गेला आहे. यात सागवानी झाडांच्या पानांचा आणि कोवळ्या फांद्यांचा राबामध्ये जास्त उपयोग झाल्याचे दिसून येत आहे. यालाच कवळं काढणे असे म्हणतात. यामुळे सागाची झाडं बोडकी झाल्याचेही दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी कवळं तोडताना 7-8 शेतकर्‍यांना हकनाक वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जीव गमवावा लागल्याचे दुर्दैवी सत्य तालुक्याला अनुभवावे लागले आहे. एकीकडे सागाची पाने जमिनीमध्ये विघटित होऊन त्यांचे मातीत रूपांतर होण्यास जास्त अवधी लागत असल्याचे कृषीविज्ञान सांगते. त्यामुळे साग माफियांना हा हंगाम शेतीच्या मशागतीच्या निमित्ताने सागाची अवैध वृक्षतोड करण्यास प्रोत्साहित करणाराही ठरत आहे. मात्र, तरवे जाळण्याची ही कृती शेतीची मशागत करण्यास उपयुक्त नसूनही या प्रकाराबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सज्ज अथवा उत्सुक नाहीत. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वणवे आणि तरवे या जागतिक तापमानवाढीस कारणीभूत पारंपरिक दृष्टचक्राचे दरवर्षीचे सातत्य पाहता ग्रामीण स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत विशेष यंत्रणा उभी करण्यात सर्वस्तरीय दूर्लक्ष होत आहे. पोलादपूर तालुक्यातील पैठण गावातील शेतकरी संपत गंगाराम मोरे यांचा अलिकडेच कवळं तोडताना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने झाडाच्या फांदीवरच मृत्यू झाला तर माणगाव तालुक्यातील शेतकरी रघुनाथ गावडे यांनी लावलेल्या आंब्याच्या कलमांमध्ये वणव्याच्या शिरकावांनंतर झालेले लाखोची हानी होण्यासोबतच काही वर्षांची मेहनतही वाया गेली आहे.  जैवविविधतेसह फळबागांचे नुकसान करणार्‍या वणव्यांबाबत वनविभागामार्फत कोणत्याही प्रकारची जनजागृती आणि उपाययोजना करण्यात आली नाही तर तरवे म्हणजेच राब जाळण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे ही जागतिक समस्या असूनही याबाबत जागतिक स्तरावर उपाययोजना केली जात नाही. एकूणच, या समस्येने संपूर्ण जगाला घाबरविणार्‍या कोरोनापेक्षाही व्यापक स्वरूप धारण केल्यानंतर होणार्‍या र्‍हासाला कोणीही जबाबदार राहणार नाही, अशी सद्यस्थितीतील मानसिकता जगातील मानवजातीला परवडणारी नाही.

  • शैलेश पालकर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply