Breaking News

पेण, अलिबागला जाणार्या गाड्या रद्द; कर्जत परिसरातील सकाळी प्रवास करणार्यांची गैरसोय

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील ग्रामस्थांना अनेकदा शासकीय कामांसाठी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात जावे लागते. मात्र कर्जत एसटी आगाराने सकाळच्यावेळी पेण, अलिबाग येथे जाण्यासाठी असलेल्या तीन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग ते कर्जत हे अंतर साधारण 100 किलोमीटर आहे. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी एसटी हे हक्काचे वाहन आहे. सकाळी असलेल्या पेण, अलिबाग एसटी गाड्या पकडून कर्जतमधील समान्य लोक अलिबागकडे जाण्याचे नियोजन करायचे. लॉकडाऊनपासून बंद असलेली एसटी गाडी आता रुळावर आली आहे. कर्जत येथून अलिबागला जाणारी एसटी वाहतूक जानेवारी 2021 पासून सुरळीत झाली होती. मात्र मार्च महिना सुरू झाल्यानंतर अलिबाग आणि पेणकडे जाणार्‍या एसटी गाड्यांची संख्या अचानक कमी करण्यात आली आहे. त्यात सकाळी पेणकडे जाणार्‍या पहिल्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यानंतर थेट पावणे आठ वाजता कर्जत- मुरुड ही गाडी आहे. गेल्या महिन्यापासून प्रवासी नसल्याचे कारण पुढे करून साडेआठची अलिबाग आणि सव्वा नऊची पेण गाडी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबाग, पेणकडे जाणार्‍या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कामांसाठी सोमवार ते शुक्रवारी  किमान अलिबाग आणि पेण गाड्या रद्द करू नये, अशी मागणी दैनंदिन प्रवासी करीत आहेत. कर्जत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनीही पेण येथील जिल्हा वाहतूक नियंत्रकांबरोबर संपर्क साधून अलिबाग आणि पेणकडे जाणार्‍या एसटी गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. सकाळी गर्दीच्यावेळी कर्जत येथून अलिबागला जाण्यासाठी तब्बल अडीच तास गाडी नसल्याने प्रवासी संतप्त झाले असून, किमान सव्वा नऊची गाडी तरी सुरू ठेवा, अशी सूचना प्रवासी करीत आहेत.

लॉकडाऊननंतर जुन्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र प्रवासी कमी असल्याने काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मागणी असल्यास सकाळच्या वेळी पेण गाडी सुरू करण्याबाबत विचार केला जाईल.

रमेश गाडे, आगारप्रमुख, एसटी आगार, कर्जत

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply