अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे राहणार्या वारगे कुटुंबीयातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही लोकांनी पसरवली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवा पसरविणार्या समाजकंठकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी अलिबाग तहसीलदारांकडे केली आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे वारगे कुटुंबीय राहते. त्यापैकी दोन सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची अफवा गावातील काही समाजकंठकांनी पसरविली. वास्तविक वारगे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. शासनाकडे तशी नोंदही नाही, परंतु अफवा पसरविल्यामुळे वारगे कुटुंबीय सध्या मानसिक दडपणात आहे. आमच्या कुटुंबाबद्दल अफवा पसरविणार्यांवर कडक कारवाई करावी, असे अशोक वारगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.