ग्रामस्थांचे पाली तहसीलदारांना निवेदन
पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह एका फार्महाऊस मालकाने हटवले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह पुन्हा बांधून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून यासंबंधी निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, आमच्या गावातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत गावासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले होते, परंतु गावालगत असलेल्या फार्महाउस मालकाने त्यांच्या जागेत जाण्याकरिता रस्ता बनविण्यासाठी बेकायदेशीरपणे हे स्वच्छतागृह तोडले आहे. ग्रामस्थांनी विचारणा केली असता, त्यांनी मी तहसीलदार व ग्रामपंचायतकडून परवानगी आणली आहे, असे सांगितले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना विचारात घेऊन मार्गी लावायला पाहिजे होता, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे तोडलेले स्वच्छतागृह आम्हाला पुन्हा बांधून देण्यात यावे आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करावी. कारवाई न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन करू असे निवेदनात म्हंटले आहे.या वेळी अशोक जाधव, हिरामण जाधव, रमेश जाधव, स्वप्निल जाधव, रोहित जाधव, वैभव जाधव, राकेश जाधव, कल्पेश जाधव, गौरू जाधव, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष अमित गायकवाड, राज जाधव, आनंद नारायण जाधव, स्वप्निल जाधव व मोहन जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …