नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिखर धवन (56) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (58*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पाच गडी राखून पराभूत केले. पंजाबने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला मात दिली.
164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ धावबाद झाला. 11 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकार लगावत त्याने 13 धावा केल्या. शॉ बाद झाल्यावर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आणि भक्कम भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर धवन झेलबाद झाला. त्याने 41 चेंडूंत 56 धावा केल्या. त्यात सात चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. ऋषभ पंतने लवकरच तंबूचा रस्ता धरला. त्याने केवळ 7 धावा केल्या. श्रेयस अय्यरने अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी करीत अर्धशतक पूर्ण केले आणि एक बाजू लावून धरली. फटकेबाजी करणारा कॉलिन इन्ग्राम मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला आणि सामन्यात रंगत वाढली. त्याने चार चौकारांसह 9 चेंडूंत 19 धावा केल्या. निर्णायक क्षणी दुहेरी धाव घेण्याचा अक्षर पटेल याचा प्रयत्न फसला. मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांच्यात टक्कर होता होता राहिली, पण त्यामुळे पटेल नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला, तसेच नाराज होऊन तंबूत परतला. अखेर अय्यरने चौकार लगावत दिल्लीला सामना जिंकवून दिला. त्याने नाबाद 58 धावा केल्या.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंहच्या साथीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यानंतर हरप्रीत ब्रार आणि रविचंद्रन अश्विन यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करीत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. पंजाबकडून संदीप लामिच्छानेने तीन, तर अक्षर पटेल आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.