प्रशासनाला आवाहन
कर्जत ः बातमीदार
माथेरानमधील व्यापार्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे व्यवसायात आलेली मंदी, फेरीवाल्यांचे व्यवसायावर होत असलेले अतिक्रमण आणि बाहेरील घोडेचालकांनी पर्यटकांची चालवलेली फसवणूक अशा अनेक समस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली.
कोरोना परिस्थितीत माथेरानमध्ये मंदावलेला व्यवसाय यावर विचारमंथन करण्यासाठी व्यापारी फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.शहरात फेरीवाल्यांची वाढती संख्या व्यापार्यांना डोकेदुखी ठरत आहे. दोन दोन दिवस दुकानातून मालाची विक्री होत नाही. त्यात वीज बिल, पाणी बिल, मालमत्ता कर तसेच अन्न व औषधे परवाने शुल्क शासनाला भरत असताना रस्त्यावरील व्यवसाय होत नाही, मात्र राजरोसपणे सर्व नियमांची पायमल्ली करून राजकीय आश्रय देऊन फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. या संदर्भात स्थानिक प्रशासन तसेच येथील राज्यकर्त्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. याशिवाय पर्यटकांशी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होत आहे, असेदेखील व्यापार्यांनी अधोरेखित केले.
पर्यटक आणि घोडे हे माथेरानमधील प्रमुख अर्थकारणाची साधने आहेत, मात्र बाहेरील घोडेचालकांकडून पर्यटकांची फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. येत्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच माथेरानचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यापारीवर्गाला रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारी करावी अशा प्रकारच्या तीव्र भावना या वेळी उमटताना दिसल्या.
राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य ओळखून फेडरेशनच्या वतीने सर्व व्यापारीवर्गाला सुरक्षेच्या दृष्टीने सूचनादेखील करण्यात आल्या, तसेच माथेरानबाहेरील व्यक्तीस आपले दुकान भाड्याने देण्याचे झाल्यास महाबळेश्वर पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेताना दुकान मालकाने भाडेकरूसोबतचा आपला व्यवहार व्यापारी फेडरेशनच्या निदर्शनात आणणे बंधनकारक आहे आणि या भाडेकरूकडून एकदाच ठराविक रक्कम फेडरेशनकडे जमा करणेदेखील तेवढेच आवश्यक असणार आहे. या व्यापारी फेडरेशनमध्ये मालकाशिवाय भाडेकरूला कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही, असाही सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
राजेश चौधरी यांची अध्यक्षपदी फेरनिवड
येत्या काळात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यापार्यांना येणार्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेश चौधरी यांनी केले. त्यानुसार चौधरी यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत चंद्रकांत जाधव, अनंता शेलार ज्ञानेश्वर बागडे, मनोज जांभळे, राजेश शहा, गिरीश पवार, चंद्रकांत काळे, अवधूत येरफुल्ले, हेमंत पवार, पप्पू खान, किरण जाधव, रामलाल खेर, शैलेश भोसले, प्रतिक ठक्कर यांचाही समावेश आहे, तर महिलावर्गाकडून जयश्री मालुसरे, जयश्री रामाणे यांना घेण्यात आले आहे.