पेण : प्रतिनिधी
निसर्गाचे संतुलन राखून वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन होळीच्या पार्श्वभूमीवर पेण एज्युकेशन सोसायटीतील प्रा. उदय मानकवळे यांनी नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, होळी हा अवगुणांची होळी करणारा सण आहे. हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. पुराणात भक्त प्रल्हादापासून अनेक कथांचा परामर्श घेतल्यास होळी म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ या अवगुणांची पेटविलेल्या अग्नीत होळी करून नवीन तेजोमय तेजस्वी विवेक विचारांचा अंगीकार करणे होय. महाराष्ट्रात 36 पैकी सुमारे 33 जिल्ह्यांत एखादे सुके लाकूड, पेंढा, पालापाचोळा, शेणाच्या गोवर्या एकत्र करून विधिवत पूजा करून अग्नी देऊन होळी साजरी केली जाते, परंतु उत्तर कोकणात मात्र मोठमोठी महाकाय सावरीची जिवंत झाडे तोडून जाळली जातात. काही आदिवासी भागांत आंबा, जांभूळ, औदुंबर, सावर व इतर मिळेल ते पाच जिवंत झाडे तोडून जाळली जातात. अध्यात्मात कुठल्याही ग्रंथात जिवंत झाडे तोडून जाळा, असे सांगितलेले नाही. त्यामुळे कोकणवासीयांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा आदर्श घेऊन होळीत होणारी हजारो जिवंत सावरीच्या झाडांची कत्तल थांबवावी, असे आवाहन प्रा. मानकवळे यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, आज महाराष्ट्रात 151 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळग्रस्त वाळवंट होत चाललेला आहे. पशू, पक्षी, प्राणी पाण्यावाचून तडफडून मरत आहेत आणि आता तर कोरोनासारखे महाभयानक संकट आपल्याकडे आले आहे. आज आपल्याकडे सगळे काही आहे, पण निरोगी आरोग्य नसेल तर? अशा वेळी केवळ सण उत्सवाच्या नावावर हजारो झाडांची कत्तल करून जाळणे ही फार मोठी नैसर्गिक हानी ठरणार आहे. सावरीच्या झाडांवर भरपूर प्रमाणात गडद लाल रंगाची फुले येतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात मध असते. हे मध खाण्यासाठी सूर्यपक्षी, साळुंख्या, बुलबुल, कोतवाल, चम्षेवाले, वटवटे, पोपट, हळद्या आणि इतर पक्ष्यांची लगबग या झाडावर असते. कधी कधी तर पोपट, कावळा हे फुलांच्या पाकळ्याही खाताना आपणास दिसून येतात. सावरीच्या झाडांची साल, काटे यांचा आयुर्वेदात औषध म्हणून उपयोग आहे. पळस, पारंगानंतर सावराची झाडे रानावनात फुलतात व वसंत ऋतूची चाहूल लागते. ही झाडे संपूर्ण जैवविविधतेचे पक्ष्यांचे पोट भरतात. काटेसावरीची झाडे आपण एकएक करून हजारो झाडे तोडतो. आज दुष्काळ तसेच वणवे लागून वृक्षसंपदा नष्ट होत आहे आणि कोरोनासारखा भयानक व्हायरस निसर्गात पसरला आहे. संपूर्ण जग थांबवण्याची ताकद या विषाणूत आहे. आज चैनीची प्रत्येक गोष्ट माणसाकडे आहे, पण शुद्ध हवा नसेल तर आपण जगणार कसे? आपल्याकडे निरोगी आरोग्य नसेल तर सर्व व्यर्थ आहे, म्हणून येणार्या पिढीसाठी मुबलक जंगल वनसंपदा ठेवायची असेल, तर आपण सण उत्सवांच्या नावावर हौसेसाठी हजारो झाडांची कत्तल करणारे हात थांबविले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले.