ठाणे : प्रतिनिधी

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे 1101 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 17) झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार सर्वश्री किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची उपस्थिती होती. सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना असून, त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल. आज विवाह होणार्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही नातेवाईक म्हणून सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1101 जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.