Breaking News

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये?; यूपीए अध्यक्षपदावरून काँग्रेसची आगपाखड

मुंबई ः प्रतिनिधी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद भूषवायला हवे, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. यावरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बर्‍याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातील सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेले आहे. त्यामुळे अशा तर्‍हेचा वाद निर्माण करताना त्याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे. राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, संजय राऊतांचे हे विधान हास्यास्पद आहे. शिवसेना अजूनही यूपीएमध्ये नाही. असे असताना यूपीएचे प्रमुख कोण होणार हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असे म्हणणार नाहीत. काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे. असे असताना त्याचे नेतृत्व इतर पक्षाचे कुणी कसे करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातील विशिष्ट गटापुरता आणि  प्रदेशापुरता मर्यादित आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून यूपीएचे अध्यक्षपद  त्यांना मिळेल असे समजणे चुकीचे आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. शिवसेना यूपीएचा घटक नाही. त्यांनी आधी यूपीएचा घटक व्हावे आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावे लागते. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करीत असतात. एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावे लागते. राज्यातील आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. यूपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा राऊत यांना अधिकार नाही, असे सावंत म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply