पनवेल ः रामप्रहर वृत्त
अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड डान्सर ऑनलाइन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी, तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. या वेळी मनीष सराफ, सचिन सराफ, प्रशिक्षक गुरु दीपिका सराफ, अमिता सराफ आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक गुरू अॅड. दीपिका मनीष सराफ आणि अमिता सचिन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात संस्थेने समूह भरतनाट्यम सिनिअर गटात प्रथम क्रमांक, भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात प्रथम क्रमांक, सेमी क्लासिकल लहान गटात तृतीय क्रमांक, ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात तृतीय क्रमांक, सेमी क्लासिकल समूह लहान गटात द्वितीय क्रमांक पटकाविला, तसेच प्रशिक्षक गुरू दीपिका सराफ यांनी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार जिंकत सुवर्णयश व अभिमानास्पद कामगिरी केली. नृत्यआराधना कला निकेतनच्या वतीने या स्पर्धेत समूह भरतनाट्यम सिनिअर गटात प्रणिता वाघमारे, सई जोशी, वैखरी पोटे, श्रावणी थळे, नित्या पाटील, अवनी पवार, भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात तनया घरत आणि कोमल पाटील, सेमी क्लासिकल एकेरी लहान गटात ओवी नायकल, ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात वैशाली पवार, नीलम बोरडे, गौरी सातपुते, तर सेमी क्लासिकल समूह लहान गटात ज्वेता सराफ, ऋतुजा पावसकर, मेहक जोशी, ओवी नायकल, देवश्री झावरे, आदिती शेंडे, तन्वी पाटील, हर्षिता कुलकर्णी, मान्या दास यांनी सहभाग घेऊन पारितोषिके पटकाविली. या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि नागरिकांडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.