Breaking News

पनवेल मतदारसंघातील भाजप ताकदीचा बारणेंना फायदा

पनवेल : नितीन देशमुख

मावळ 33 लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघ हा  देशातील सर्वात जास्त मतदार असणारा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात उमेदवाराला मिळणारी आघाडी ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघात आपला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्याने महायुतीचे  श्रीरंग बारणेंना त्याचा फायदा होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ येतात. विधानसभा मतदारसंघनिहाय पनवेलमध्ये पाच लाख 39 हजार 185, कर्जत दोन लाख 75 हजार 480, उरण दोन लाख 86 हजार 658, चिंचवड चार लाख 76 हजार 780, पिंपरी तीन लाख 41 हजार 701 आणि मावळ तीन लाख 32 हजार 112 मतदार आहेत. मावळमध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघ हा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांची धडपड सुरू आहे. रायगडमधील तीन मतदार संघात 11 लाख एक हजार 323 मते आहेत. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात आठ लाख 25 हजार 843 मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे वर्चस्व आहे त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना होणार आहे.

पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी आहे. त्यांचे अस्तित्व नगण्यच आहे. शेकापक्षाचे मतदार या मतदारसंघात आहेत  हे नाकारून चालणार नाही. पण आता या दोन्ही मतदारसंघात कोस्मोपोलिटीन मतदार वाढले आहेत. हे मतदार शेकापक्षासारख्या आता जिल्हा पातळीवर मर्यादित असलेल्या पक्षाला मत देण्याची शक्यता नाही. शेकापक्षाने सतत काँग्रेस विरुद्ध लढा दिला. निवडणुकीनंतर  अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागले. आजही अनेकांना न्यायालयात फेर्‍या माराव्या लागत आहेत.

शेकापच्या नेत्यांनी आपला पारंपरिक शत्रू असलेल्या काँग्रेसबरोबर केलेली हातमिळवणी कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. त्याचा परिणाम म्हणूनच के. के. म्हात्रे यांच्यासारख्या कार्यकर्त्याने पक्ष सोडून आपल्या अनुयायांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा मोठा फटका आघाडीला बसणार आहे. हे लक्षात येताच माजी आमदार विवेक पाटील यांना प्रकृती ठीक नसताना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात येऊन पार्थ पवारला मते देण्यासाठी भावनिक आवाहन करावे लागले. या मतदारसंघात मनसेचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. त्यामुळे पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीला प्रचंड आघाडी मिळणार हे सिद्ध होत आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply