उरण ः वार्ताहर – उरणमधील बौद्धवाडी येथील चारवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपी रोहन राजेंद्र कासारे (20) यास दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आरोपी राजेंद्र कासारे यांनी याच ठिकाणी रहाणार्या चारवर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्या काकांकडे नेतो, असे सांगून घरी नेऊन जबरी संभोग केला. त्यानंतर तिला मारहाण करून ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दिवाणात लपवून ठेवले. याप्रकरणी पीडितेच्या काकांनी उरण पोलीस ठाणे येथे आरोपी रोहन कासारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. उरण पोलिसांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोप सत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड. आशिष बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 12 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या केसमध्ये पीडित फिर्यादी, साक्षीदार सुचिता कासारे, रासायनक विश्लेषक व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तपास अंमलदार शिवाजी गणपत काठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उरण पोलीस यांचा तपास महत्वाचा ठरला. पोलीस शिपाई स्वप्नील म्हात्रे यांचे सहकार्य मोलाचे ठरले. सरकारी पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने 27 जून 2019 रोजी आरोपी रोहन कासारे याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.