Breaking News

पनवेलमध्ये 30 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई; दोघे जण वाहनासह ताब्यात

पनवेल : वार्ताहर

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये 30 लाखाचा गांजा हस्तगत केला असून या प्रकरणी दोघा जणांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले आहेत. नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा साठा गुन्हे शाखा 2 पनवेल यांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 करीत आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील यांनी नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केली आहे. पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 चे पोलीस नाईक प्रफुल्ल मोरे यांना बातमी मिळाली की, एक इनोव्हा कार (एमएच 04-सीजे 9363) मध्ये गांजा हा अमली पदार्थ असून ती कार टेंभुर्णी येथून पनवेलमार्गे मुंबईला जाणार आहे. या बातमीद्वारे अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील व उपआयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेत्तृत्वाखाली, सहाय्यक संदीप गायकवाड, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, हवालदार साळूंखे, अनिल पाटील, सचिन पवार, नाईक डोंगरे व इतर अंमलदारांनी इनोव्हा कार ही मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील पनवेल बायपास येथे ताब्यात घेतली. या वेळी कारमध्ये मागील सीट, डिकी, दोन्ही सिटी मधील रिकाम्या जागेत असे एकूण 10 प्लास्टिक गोण्यामध्ये एकूण 30 लाख रुपये किमतीचा 200 किलो गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. हा गांजा जवळ बाळगून वाहतूक केल्या कामी कारचा ड्रायव्हर अशितोष आनंद पातुरे (वय 21, रा. आझादनगर चाळ, रूम नं 2, टेप व्हिलेज, अंधेरी (प.) मुंबई) व त्याचा साथीदार आसिफ अब्दुल मेमन (वय 26, रा. हनुमान नगर, रुम नं 1, एसबी रोड, बोरवली पूर्व, मुंबई) त्यांच्याविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पनवेल परिसरामध्ये बाहेरील राज्यांतील नागरिक येऊन अशा प्रकारचा अन्य अमली पदार्थांचा साठा विक्री करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. पोलीस अशा नागरिकांवर कारवाई करीत आहेत.

पनवेल परिसरातून चोरीस गेलेल्या सायकली हस्तगत

पनवेल : पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 14 सायकली हस्तगत केल्या आहेत.या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक देवळे, उपनिरीक्षक सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने पनवेल परिसरात अधिक शोध घेत असताना त्यांना आरोपी दिनेश जाधव (वय 32) याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून विविध नामांकित कंपन्यांच्या 14 सायकली ज्याची किंमत जवळपास 58 हजार रुपये इतकी आहे. हस्तगत करण्यात आल्या आहेत. पनवेल परिसरातून ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सायकल खरेदी केलेली पावती अथवा कागदपत्र घेऊन सायकलची ओळख पटवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळे यांनी केले आहे. 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply