Breaking News

भारताची डिजिटल क्रांती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रूपी’चा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतातील नवे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई रूपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) शुभारंभ करण्यात आला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाऊचर आहे, जे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. विशेष म्हणजे या सेवेसाठी कुठलेही अ‍ॅप, इंटरनेटची आवश्यकता नाही. एकवीसाव्या शतकात भारत कशा पद्धतीने पुढे चालला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांशी कसा जोडला जात आहे याचे ई-रूपी हे एक उदाहरण आहे. देशातील नागरिक 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना ही सेवा सुरू झाली असून याचा मला खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले. केवळ सरकारीच नव्हे तर खासगी संस्थांना जर कोणाला शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय सेवेसाठी मदत करायची असेल त्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी ई रूपी प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. तुम्ही दान केलेली रक्कम ही केवळ संबंधित कामासाठीच खर्च केली जाईल याची तुम्हाला खात्री मिळेल, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले.

येथे वापरू शकता ई-रूपी

विविध व्यवहारांखेरिज बालकल्याण, टीबी निर्मूलन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान या सरकारी योजनांसाठी ई-रूपीचा वापर केला जाऊ शकतो. खासगी क्षेत्रदेखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाऊचरचा लाभ घेऊ शकते.

देशात डिजिटल पेमेंट आणि थेट बँक ट्रान्सफरला चालना देण्यासाठी ई-रूपी व्हाऊचर  महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे सर्वांना नेमकी, पारदर्शी आणि अडथळ्याविना पैशांची देवाण-घेवाण मोफत करता येणार आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply