पनवेल ः वार्ताहर
खारघर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला चेंबूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अभिषेक अजित खरात (31) असे या आरोपीचे नाव असून, 3 फेब्रुवारी अभिषेक आणि त्याचा साथीदार तेजस देवळेकर (19) या दोघांनी आपल्या ओळखीतील 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करुन पलायन केले होते. त्यानंतर पोलिसांनी तेजसला अटक केली होती, तर अभिषेक फरारी झाला होता. घटनेतील पीडित तरुणी आणि तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करणारे आरोपी सर्व खारघरमध्ये एकाच भागात राहणारे असून ते पीडित तरुणीच्या ओळखीतील होते. 3 फेब्रुवारी रोजी रात्री पीडिता रहात असलेल्या भागात हळदीचा कार्यक्रम असल्याने ती आई-वडिलांसह हळदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती. त्या वेळी तरुणीला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी गेली असताना, आरोपी अभिषेक आणि तेजस या दोघांनी तिला जवळच असलेल्या मिनीबसमध्ये नेऊन शितपेयात दारू मिसळून तिला पिण्यासाठी दिले होते. त्यामुळे तरुणी बेधुंद झाल्यानंतर दोघांनी बसमध्येच तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर दोघांनी तिला अंधारात तळोजा भागात निर्जनस्थळी नेऊन सोडले. पीडित तरुणीने काही नागरिकांच्या मदतीने आपले घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी अभिषेक आणि तेजस या दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तेजस देवळेकर याला तत्काळ अटक केली होती, पण या घटनेतील मुख्य आरोपी अभिषेक खरात फरार झाला होता. मागील दीड महिन्यापासून खारघर पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आरोपी अभिषेक खरात चेंबूर येथील लाल डोंगर परिसरात लपून रहात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चेंबूर पोलिसांना याबाबत कळविले. चेंबूर पोलिसांनी लाल डोंगर परिसरातून अभिषेक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो खारघर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.