Breaking News

मोर्बे धरणाची गळती थांबणार; दुरुस्तीकामाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात

पनवेल : बातमीदार

सिंचन प्रकल्पासाठी 45 वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यात पाटबंधारे विभागाने बांधलेल्या मोर्बे धरणाची गळती थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून धरण दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून अल्पावधीतच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

50 किलोमीटरपेक्षा अधिक भूभागावर व्यापलेल्या मोरबे धरणात 3.22 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. शेती सिंचन प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणी वापराविना पडून असते, मात्र ते इतर कारणांसाठी कधी वापरात आले नाही. धरण परिसरातील खैरवाडी, मोर्बे आणि खानाव ग्रामपंचायतीला शेती सिंचनासाठी पाणी दिले जाते. यामुळे पनवेल तालुक्यात इतरत्र कुठेही न होणारी दुबार भातपेरणी या परिसरात होते. या भागातील अनेक शेतकरी जानेवारीत भातपेरणी करून मे महिन्यात भातपीक याच पाण्याच्या ताकदीवर काढतात. शिवाय अनेक भाज्यांची लागवड करून शेतकर्‍यांना आर्थिक साह्यदेखील मिळते. मागील अनेक वर्षांपासून या धरणाला लागलेल्या गळतीमुळे धरणातील पाणी कायमस्वरूपी वाहत असते. या वाहणार्‍या पाण्यामुळे पुढे गाढी नदीला जाऊन मिळणार्‍या ओढ्याला बारमाही पाणी असते. या गळणार्‍या पाण्याच्या जोरावर नदी परिसरातील ग्रामपंचायतींना विहिरी खोदून त्याद्वारे पाणीपुरवठा केला आहे. परंतु याद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. धरणातील पाणीसाठ्याचा वापर होत नसलेल्या धरणाची आता डागडुजी केली जाणार असल्यामुळे यंदा मोर्बे कालव्यातून पाणीदेखील सोडण्यात आले नाही. कर्जत पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयाला पाठविले असून मंजूरदेखील झाले आहे. यंदा कालव्याला शेतीसाठी पाणी सोडले असते, तर शेतकर्‍यांनी भातशेती केली असती आणि मध्येच डागडुजीसाठी पाणी रिकामे करावे लागले असते तर पुन्हा शेतीला पाणी मिळाले नसते म्हणून यंदा शेतीला पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन कोटी रुपयांच्या सिमेंटच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली असून पाटबंधारे विभागाच्या विशिष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गळके धरण दुरुस्त केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात डागडुजीचे काम हाती घेण्यात येईल, असा विश्वास पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अजित कदम यांनी व्यक्त केला.

गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार पाणी

अनेक वर्षे धरणातील पाण्याचा वापर परिसरात होणार्‍या नव्या गृहनिर्माण सोसायट्यांना व्हावा, यासाठी या भागातील विकासक प्रयत्नशील होते. शेतीक्षेत्र कमी होत असल्यामुळे जलसंपदा विभागाने सहा महिन्यांपूर्वी धरणातील पाणी गृहनिर्माण सोसायट्यांना वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे धरण डागडुजीचा फायदा होणार आहे.

मोर्बे धरणाच्या पाण्यामुळे आमच्या भागातील शेतकरी अनेक वर्षे चांगली शेती करू शकला. त्यामुळे धरणाची डागडुजी करणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय या भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या हिताचा आहे. लवकरात लवकर हे काम हाती घ्यावे.

-गणेश पाटील, ग्रामस्थ कोंडले

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply