मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. पहिल्यांदाच मार्च महिन्यात पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. याचा फटका इथल्या आंबा पिकाला बसला आहे. कडक उन्हामुळे आंब्याचा मोहोर करपून काळा पडला आहे. दक्षिण रायगडातील काजू पीकालाही या उष्णतेच्या लाटेचे चटके जाणवू लागले आहेत.
साधारणतः होळी झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात ऊन वाढायला सुरूवात होते. मात्र यंदा त्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला. उन्हाच्या झळा मार्चच्या दुसर्या आठवड्यापासूनच सुरू झाल्या. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट आली. अनेक भागात तापमान 40 ते 42 अंश सेल्सीयस वर गेले आहे. याचा त्रास माणसांबरोबरच निसर्गालादेखील जाणवत आहे. यंदा आंब्याच्या बागा चांगल्या मोहोरल्या होत्या, परंतु फळधारणेला सुरूवात होण्याच्या कालावधीतच कडक उन्हाच्या मार्याने हा मोहोर करपून गेला. त्यामुळे आंब्याच्या बागा पुरत्या काळवंडल्या आहेत.
जिल्ह्यात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, अलिबाग या भागातील मोहोर करपल्याने गळून पडला आहे. त्यामुळे आंब्याचा हंगाम फुकट जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मोहोर चांगला आला असतानाही फळधारणेच्या वेळीच बदलत्या हवामानामुळे आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. त्यातील 14 हजार हेक्टर क्षेत्र हे उत्पादनक्षम आहे. गेल्या वर्षी आंब्याचे उत्पादन चांगले होवूनही कोरोनामुळे आंबा विकता आला नाही आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. यंदा आलेला मोहोर उन्हामुळे करपून गेला. त्यामुळे यंदाही पीक हातचे जाणार या भीतीने बागायतदार चिंतग्रस्त झाले आहेत.
सध्याचा हंगाम हा झाडांना पालवी फुटण्याचा आहे. या पालवीबरोबरच आंब्याला मोहोर येईल, अशी शेतकर्यांना आशा आहे. बागा पुन्हा मोहोरल्या नाही, तर यंदाही आंब्याच्या पीकापासून मुकावे लागणार आहे.
काजू पीकही संकटात
दक्षिण रायगडातील म्हसळा, माणगाव, श्रीवर्धन आणि माणगाव भागात आंब्याबरोबरच काजूच्याही बागा आहेत. या बागांनाही कडक उन्हाचा फटका बसला आहे. काजू डागाळला आहे. त्यामुळे यंदा काजूच्या उत्पादनातही घट होण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षी कोरोनामुळे आंबा बाजारात गेलाच नाही. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळात आंब्याची झाडे मोठ्या संख्येने उन्मळून पडली. त्यातून वाचलेली झाडे चांगली मोहोरली होती. परंतु कडक उन्हामुळे मोहोर करपला. सगळा मोहोर गळून पडला आहे. आता पुन्हा मोहोर आला तर ठीक नाही तर यंदाही आंब्याचे पीक हातचे जाईल असे वाटते.-कल्पेश बेलोसे, बागायतदार, अलिबाग