नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटात देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अशा कठीण स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पीएम केअर्स फंड अंतर्गत जिल्हा रुग्णालयांत आता 551 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंड अंतर्गत देशात 551 मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिनजची उपलब्धता वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार पीएम केअर्स फंड अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी 551 ऑक्सिजन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंड अंतर्गत सर्व ऑक्सिजन प्लांट हे विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत जिल्हा सरकारी रुग्णालयांत उभारले जातील. ऑक्सिजन प्लांटची खरेदी आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येईल. देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या उद्देशाने हे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत, असे पीएमओकडून सांगण्यात आले. हाऊस कॅप्टिव्ह ऑक्सिजन जनरेशन सुविधा जिल्हा रुग्णालयांची ऑक्सिजनची दैनंदिन आवश्यकता पूर्ण करतील. लिक्विड ऑक्सिजन कॅप्टिव्ह ऑक्सिजन जनरेशनसाठी टॉपअपचे काम करतील. कुठल्याही संकटाच्या स्थितीत ऑक्सिजन प्लांट रुग्णांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा देण्याचे काम करतील. त्यामुळे उपचारात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, असेही पीएमओकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद येथे ही झाडे उभारली जातील. लातूर, नांदेड, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हे प्लांट लावले जाणार आहेत.
महाराष्ट्रासाठी सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रिक टन ऑक्सिजन, जो गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसह कोणत्याही राज्याशी तुलना केल्यास दुपटीहून अधिक आहे, तो दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानतो.
–देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात पीएम केअर्स फंड अंतर्गत देशातील विविध जिल्हा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
–अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील
व्यक्तींचे मोफत लसीकरण
मुंबई ः राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरणावरही लक्ष केंद्रित केले असून, 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतच्या निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. मोफत लसीकरणासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी या वेळी दिली. देशातील मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गोवा, केरळ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, प. बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा या राज्यांनी यापूर्वीच मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.
देशात 24 तासांत 2767 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली ः एकीकडे देशात 1 मेपासून व्यापक स्तरावर लसीकरण केले जाणार असताना दुसरीकडे देशातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागले आहे. रविवारी (दि. 25) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 24 तासांत तब्बल 2767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या एक लाख 92 हजार 311 इतकी झाली आहे. त्यासोबतच 24 तासांत सलग चौथ्या दिवशी भारतात तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार 24 तासांत तीन लाख 49 हजार 691 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली असून आजघडीला देशात कोरोनाचे एकूण 26 लाख 81 हजार 751 अॅक्टिव रुग्ण आहेत. देशात आजपर्यंत एकूण एक कोटी 69 लाख 60 हजार 172 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी एक कोटी 40 लाख 85 हजार 110 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे.