Breaking News

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; वीकेण्डला लॉकडाऊन; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, दर शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी (दि. 4) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत हे नियम लागू असतील. त्याचप्रमाणे रात्री 8पासून सकाळी 7पर्यंत राज्यात संचारबंदी असेल, तर इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून, कामगारांवर बंधने नसतील. कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, तसेच इतर पक्षांच्या नेत्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जिमचालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केली. राज्यात कोरोना वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांना सहकार्याचे आवाहन केल्याचे मलिक यांनी सांगितले. राज्यात आठवड्याला लॉकडाऊनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहातील, तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजार्‍यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसतील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

विवेचन, चर्चा करा!

राज्य सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधांची चर्चा करून चालणार नाही, तर त्यासोबत नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने का वाढतो आहे? महाराष्ट्रातच का वाढतो आहे? त्याच्या पाठीमागची कारणे काय आहेत? या संदर्भातदेखील सरकारने विवेचन व चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

सरकारला पूर्ण सहकार्य करणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले, तसेच या वेळी त्यांनी सरकारने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे याबाबत विवेचन करायला हवे, असादेखील सल्ला दिला. राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध असणार आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो की, या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावे. भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांनीदेखील आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांना लस घेता येईल या दृष्टीने लसीकरण मोहिमेतही भाजपचे कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी होतील. ज्या काही उपाययोजना राज्य सरकारच्या वतीने केल्या जातील, त्या उपाययोजनांना सहकार्य करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे आम्ही समजतो, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply