हवामान विभागाकडून महाराष्ट्र प्रवेश जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (10 जून) त्याचा प्रवेश जाहीर केला. यासोबतच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता, मात्र वार्यांचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. 31 मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहचला, पण त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता, परंतु प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मोसमी पावसाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होईल, असे हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केले होते. त्यानुसार हा प्रवेश झाला आहे.
मोसमी पावसाने कर्नाटकचा बहुतांशी भाग व्यापून गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर तो दक्षिण कोकणाची वेस ओलांडून वेंगुर्ल्यापर्यंत पोहचला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. समुद्रातून येणार्या बाष्पामुळे सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.