विजापूर ः वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले आहेत. यातील 14 बेपत्ता जवानांचे मृतदेह रविवारी (दि. 4) सकाळी सापडले. दरम्यान, या चकमकीत 15 नक्षलवादी शहीद झाल्याचे वृत्त असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही अचानक चकमक उडाली होती. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते. या वेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांकडूनही गोळीबार करण्यात आला. या धुमश्चक्रीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद, 12 जण जखमी, तर 14 जवान बेपत्ता झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली होती. या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह रविवारी सकाळी जंगलात आढळून आले. त्यामुळे नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत एकूण 20 जवान शहीद झाले आहेत. आणखी एक जवान अजून बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. या धुमश्चक्रीत तब्बल 31 जवान जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.
बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करीत जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात नमूद केले आहे की, माझ्या संवेदना नक्षलवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.
गृहमंत्री शाहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच सीआरपीएफ महासंचालकांना छत्तीसगडला जाण्याचे आदेश दिले. शाह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वीर जवानांचे बलिदान आपण विसरू शकणार नाही. आम्ही शांतता आणि विकासाच्या शत्रूंशी लढत राहू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.