पेण : प्रतिनिधी
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पेणमध्ये मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी मंगळवारी (दि. 6) बाजारपेठ, नाका, मिरची गल्ली येथे जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांनी दुकानात गर्दी केली होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. पेण तालुक्यात कोरोना रूग्णाची संख्या वाढत असून सोमवारी रुग्णसंख्या 186 होती. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासाठी शहरात गर्दी करणार्या व विनामास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली असून वाढत्या संसर्गामुळे नागरिकांसाठी नगर परिषद कार्यालय 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. पेण तालुक्यातून येणार्या नागरिकांची शहरात गर्दी होत असून काही ठिकाणी नागरिक जमाव करून उभे राहत आहेत. तसेच कोरोना नियमांचे पालन न करणार्या नागरिक आणि दुकानदारांवर पोलिसांच्या मदतीने नगर परिषद कर्मचारी कारवाई करीत आहेत. पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी मंगळवारी शहरातील नाक्यावर, बाजारपेठेत फिरून दुकानदार व नागरिकांना समज दिली व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता आपल्या परीने सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. नगर परिषद कार्यालयात येणार्या लोकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्यांची कामे कारवायांची आहेत. तसेच यापुढे नियम ना पाळणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यधिकारी अर्चना दिवे यांनी सांगितले.