Breaking News

एमआयडीसीसाठी पेणमध्ये भूसंपादन; औद्योगिक वसाहतीबाबत शेतकरी अनभिज्ञ

पेण : प्रतिनिधी 

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) तर्फे पेण तालुक्यातील गडब (काराव), डोलवी, वडखळ, बोरी या चार ग्रामपंचायत हद्दीतील दोन हजार 120 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी  एमआयडीसीने शेतकर्‍यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे, मात्र ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित होणार की खासगी प्रकल्पासाठी हे अस्पष्ट आहे. एमआयडीसीने जमीन संपादीत केली तरी भाव किती असणार, रोजगार प्रत्येकाला मिळणार का? कंपन्यांमुळे प्रदुषण होणार का, गावाचे पुनवर्सन करावे लागेल का, अशा चर्चानीही वेग घेतला आहे. अगोदरच या ग्रामपंचायत हद्दीत जेएसडब्ल्यू कंपनीने शेकडो एकर जागा संपादित करून प्रकल्प उभारला आहे. अशाच प्रकारे नव्याने येणार्‍या प्रकल्पात रोजगार, भाव किती असेल जमीन द्यायची की नाही याबाबतच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.  एमआयडीसीला गडब, डोलवी, वडखळ, बोरी या चार ग्रामपंचायत हद्दीतील दोन हजार 120 एकर जमीन संपादित करायची असून त्यात जेएसडब्ल्यू कंपनीची 418 एकर, शेतकर्‍यांची एक हजार 537 एकर आणि 165 एकर शासकीय जमीनीचा समावेश आहे. वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील वावे, बोरी ग्रामपंचायत हद्दीतील बेणेघाट, डोलवी ग्रामपंचायत हद्दीतील जेएसडब्ल्यू, काराव ग्रामपंचायत हद्दीतील खारकारावी, खारमाचेला, खारघाट, काराव, खारढोबी, खारचीर्बी या गावांचा समावेश आहे. अगोदरच या ग्रामपंचायतींच्या हद्दीत जेएसडब्ल्यू कंपनी आली आहे. या कंपनीमुळे स्थानिक 50 टक्के तरुण तरुणींना रोजगार मिळाला आहे, मात्र कंपनीच्या बाजूने शिल्लक असणारी जमीन खारेपाणी येत असल्याने नापीक झाली आहे. अशा जागेला सध्याच्या भावापेक्षा अधिक दर मिळणार असेल तर व रोजगाराची संधी असेल तर येणार्‍या प्रकल्पाला अधिक विरोध न होता पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे, अशीही चर्चा सुरू आहे. परंतु शेतकरी बांधवाना विश्वासात घेणेही गरजेचे आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply