Breaking News

पालीमध्ये घरकुल घोटाळा

एकाच कुटूंबातील दोन भावांना योजना मंजूर; उपायुक्तांकडे तक्रार

पाली ़: प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करून पाली येथील एकत्र कुटुंबातील दोन भावांना घरकुल योजनेतून दोन स्वतंत्र नवीन घरकुले मंजूर केली असून, ती रद्द करुन संबंधीत शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर कारखानीस यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

सुधागड तालुक्यातील पाली येथील सुधीर वामन कारखानीस यांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये विलास सुतार व दत्ता सुतार हे दोन सख्खे भाऊ एकत्र कुटुंबात  कौलारू घर बांधून राहत आहेत. असे असतांनाही या दोन भावांना प्रधानमंत्री आवास योजना 2020-21 मधील शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून दोन स्वतंत्र नवीन घरकुले मंजूर केली आहेत, अशी माहिती सुधीर कारखानीस यांनी माहिती अधिकाराखाली मिळवली आहे. या संदर्भात त्यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, ही योजना रद्द करून संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सुधीर कारखानीस यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, या प्रकरणी सुधागड-पाली गटविकास अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही व जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणीसुद्धा केली नाही. तसेच लाभार्थींना दिलेल्या अनुदानाची रक्कम वसूल केली नाही. व घरकुल मंजुरीचे आदेश रद्द केलेले नाहीत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अलिबाग येथील कार्यालयात त्यांची 8 मार्च 2019 रोजी भेट घेऊन त्यांना तक्रारी अर्जातील मजकूराची सविस्तर माहिती दिली होती. तक्रारी अर्जही सादर केला होता. मात्र त्यांच्याकडूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

या प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी कारखानीस यांनी सुधागड तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांकडे  लेखी तक्रार अर्ज करून हरकत घेतली होती. तसेच सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास परवानगी देऊ नये व अनुदान वर्ग करू नये असे लेखी अर्जाद्वारे कळविले होते.

ज्यांचा मूळ सर्व्हेच्या ब यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्राधान्याने घरकुल देणे बंधनकारक आहे. जोपर्यंत ब यादी संपत नाही, तोपर्यंत दुसर्‍या यादीला मान्यता देता येत  नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा लागतो. सदर जागेच्या मिळकतीचा वाद असल्याने या प्रकरणात अनुदानाचा पुढील हप्ता थांबविला आहे.

-गजानन लेंडी, गटविकास अधिकारी, पाली-सुधागड

या प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

-दिलीप रायन्नावार, प्रशासक, पाली नगरपंचायत

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply