Breaking News

सावित्री नदीपात्रालगत होणार रिंगरूट प्रकल्प : पालकमंत्री

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 10) पाहणी केली. या वेळी त्यांनी महाड शहराला सावित्री नदीच्या पाण्याचा धोका पाहता शेडावपासून केंबुर्लीपर्यंत सात किमीची संरक्षक भिंत बांधून रिंगरूट प्रकल्पांतर्गत तिचा विकास करणार असल्याचे सांगितले. सर्व आपद्ग्रस्तांच्या व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाला अहवाल कळवा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

महाड शहराच्या काही भागात गेले 15 दिवस पुराने बस्तान बांधले होते. 6 ऑगस्टला महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला महाप्रलयाचा फटका बसला. यात व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड हाल व नुकसान झाले. या आपत्तीनंतर पाहणी करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शनिवारी महाडला आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे बिपीन महामुणकर, राजेय भोसले, जयवंत दळवी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, मुख्याधिकारी जीवन पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्र्यांनी महाडमध्ये व्यापारी व नागरिकांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. महाड शहरात प्रवेश करणारा केंबुर्ली ते पानसार मोहल्ला गांधारी पुलासह मार्ग महाड नगर परिषदेकडे वर्ग करण्याबाबत प्रस्ताव प्रलंबित असून, याबाबत मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, तसेच सावित्री नदीचे पुराचे पाणी महाड शहरात घुसू नये यासाठी सात किमीच्या रिंगरूट प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा आणि जेथे पशुधनाची हानी झाली असेल तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तिक पंचनामे करावेत, अशा सूचनादेखील पालकमंत्र्यांनी दिल्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply