मँचेस्टर : वृत्तसंस्था
लिओनेल मेसीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडवर 1-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
ल्युक शॉ याच्या स्वयंगोलमुळे 12व्या मिनिटाला बार्सिलोनाने खाते खोलले. त्यानंतर बार्सिलोनाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. मँचेस्टर युनायटेडला या सामन्यात आपला खेळ उंचावता न आल्याने सामन्याच्या सुरुवातीलाच झालेला स्वयंगोल बार्सिलोनाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.
पहिल्या सत्रात युनायटेडच्या दिओगो डलोट याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या बराच बाजूने गेला, मात्र 2005नंतर प्रथमच मँचेस्टर युनायटेडला गोल करण्यासाठी एकही फटका लगावता आला नाही. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी मँचेस्टर युनायटेडला पॅरिस सेंट जर्मेनविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. दोन गोलने पिछाडीवर असतानाही युनायटेडने पॅरिस सेंट जर्मेनला 4-2 असे हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
बार्सिलोनाने मात्र सातत्याने युनायटेडच्या बचावपटूंवर दडपण आणत गोलरक्षक डेव्हिड डे गियाला संकटात आणले, पण डे गियाने फिलिपे कुटिन्हो आणि मेसी यांचे प्रयत्न हाणून पाडले. बार्सिलोनाच्या खेळाडूंनाही दर्जेदार खेळ करता आला नसला, तरी विजयामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा उंचावल्या आहेत.