Breaking News

निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचे जागते रहो

गांजाची विक्री करणारा आरोपी गजाआड; चार किलो 190 ग्रॅम गांजा जप्त

पनवेल : वार्ताहर : लोकसभा निवडणुकीच्या अवैध दारू विक्री, अवैध अमली पदार्थ विक्री करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याबाबत मोहीम चालू असताना तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनी निकम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तळोजा पोलीस ठाणे हद्दीत भास्कर मधुकर भगत (वय 38) हा इसम अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याचे बातमीदाराकडून समजताच त्या तळोजा पोलिसाकडून नितळस फाटा येथे सापळा रचण्यात आला. या सापळ्यामध्ये भास्कर मधुकर भगत या इसमाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ताब्यातील अंदाजे एकूण 41900 रु. किमतीचा चार किलो 190 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ ताब्यात घेतला असून 30,000 रु. किमतीची अ‍ॅक्टीव्हा मोटरसायकल (एमएच 05 बीटी 0608) जप्त करण्यात आली आहे, तसेच त्याच्याकडून 10,000 रु. किमतीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून एकूण 81,900 रु. किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पनवेल कोर्ट येथे रिमांड कामी हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हेगार विरुद्ध अवैध दारुविक्री, अवैध अमली पदार्थ विक्री करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याबाबत सर्वत्र मोहीम चालू आहे, याच दरम्यान दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनि निकम यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आडागळे, सपोनि निकम, सपोनि गीते व पथक यांनी नितळस फाटा येथे सापळा लावून रात्री 10.15 वाजताच्या सुमारास आरोपी भास्कर मधुकर भगत (वय 38, रा. कुलस्वामिनी मंदिराजवळ दिवा (प) ता. जि. ठाणे, रूम नंबर 5 सचिन निवास चाळ) या इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील मरून रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा मोटरसायकलसह ताब्यात घेतली. अ‍ॅक्टिवा मोटरसायकलच्या डिकीमध्ये एकूण चार किलो 190 ग्रॅम गांजा हा पदार्थ मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 71/2019 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985चे कलम 8 (क), 20 (ब) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे, तसेच आरोपी भास्कर मधुकर भगत त्याच्याकडून 41900 रुपये किमतीचा चार किलो 190 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, तसेच 30 हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिवा मोटरसायकल, 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 81 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल तळोजा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीला आज 10 एप्रिल 2019 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास 15 एप्रिल 2019 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कारवाई अशोक दुधे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, रवींद्र गीते सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग व अजय कुमार जरांगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आडगळे, सपोनि निकम, सपोनि गीते, पोहवा शिंदे, पोना. पवार, पोना. पाटील, पोशि. माळशिकारे, पोशि पाटील यांनी केला असून पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत. सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता सदर आरोपी हा मुंब्रा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर ठाणे येथे गांजा अमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल आहे.

कंपनीतील कार्बाईड इन्सर्टची चोरी

पनवेल : बातमीदार : कमर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि, कमर इस्टेट या कंपनीतील स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या सात लाखांच्या कार्बाईड इन्सर्टची चोरी करण्यात आली आहे. तळोजा पोलिसांनी यातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमोल जनार्दन भोसले कमर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि, कमर इस्टेट, तळोजा एमआयडीसी या कंपनीत स्टोअर किपर म्हणून नोकरी करत असून या कंपनीत ड्रिलिंग टूल बनविण्याचे काम चालते. हे टूल बनविण्यासाठी चीन देशातून कार्बाईड इन्सर्ट नावाचा पार्ट आयात करतात. त्यांनी 24 लाख 36 हजार रुपयांचा कार्बाईड इन्सर्ट माल आयात केला होता. यापैकी कंपनीतील स्टोअर रूममध्ये असलेला कार्बाईड इन्सर्ट नं क्यूसी 9050, हा माल चेक केला असता सात लाख रुपयांचा माल कमी मिळून आला म्हणून स्टोअरचे रेकार्ड चेक केले. या वेळी त्यांनी गेटवर प्रत्येक कामगारांची संपूर्णपणे चेकिंग करण्यास सांगितले असता सचिन महादेव म्हात्रे याच्या बुटात कार्बाईड इन्सर्टचे एकूण 65 नग मिळून आले. सचिन म्हात्रे यांनी भोसले यांना सांगितले की, त्याच्यासोबत कंपनीत काम करणारे राजेश रामचंद्र लाड, शत्रुघ्न भुईधर गौड, रमेश गावड, तसेच संतोष गायकर यांनीही कंपनीत चोरी केली आहे. सचिन म्हात्रे याने कंपनीतून चोरी केलेला माल त्याने संतोष गायकर, तसेच भंगार विक्रेता अब्दुल रशीद शेख यास विक्री केला आहे. तळोजा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टायर चोर गजाआड; 98 हजारांचा माल हस्तगत

पनवेल : वार्ताहर : पनवेलसह कळंबोली परिसरातून टायरची चोरी, तसेच डिस्कची चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट 2 पनवेलच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून जवळपास 98 हजारांचा माल हस्तगत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेेलसह कळंबोली परिसरातून उभ्या ट्रकचे टायर, तसेच डिस्क चोरीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात गुन्हे शाखा युनिट 2 चे वपोनि के. आर. पोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक संबंधित आरोपीचा शोध घेत असताना पो.ह. पाटील याला या संदर्भातील सराईत गुन्हेगार कबरुद्दीन हसन मलिक (32 रा. खिडूकपाडा) याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याने सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेेतले असता अधिक तपासामध्ये त्याने आतापर्यंत 10 ट्रक टायर व 3 डिस्क व इतर साहित्य असा मिळून जवळपास 98 हजाराचा माल पोलिसांना दिला आहे. याच्या अटकेमुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा, तसेच कळंबोली पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कारची काच फोडून लॅपटॉप व रोकड लंपास

पनवेल : बातमीदार : खारघर सेक्टर-21 मधील तवा हॉटेलसमोर कार पार्क करून  जेवणासाठी गेलेल्या तरुणाच्या कारची काच चोरट्याने फोडून कारमधील 18 हजाराची रोख रक्कम आणि लॅपटॉप असा सुमारे 33 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. खारघर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आदित्य यादव (25) हा खारघर सेक्टर-6 मध्ये राहण्यास असून त्याचा शिपिंगचा व्यवसाय आहे. गत सोमवारी सायंकाळी आदित्य सेक्टर-10 मध्ये असलेले कार्यालय बंद करून तो आपला लॅपटॉप व 18 हजाराची रोख रक्कम असलेली बॅग हुंडाई आयटेन कारमध्ये ठेवून आपल्या घरी गेला होता. त्यानंतर आदित्य आईसह खारघर सेक्टर-21 मधील तवा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. या वेळी आदित्यने आपली कार हॉटेल समोरच्या रस्त्यावर उभी केली होती. याच दरम्यान, अज्ञात  चोरट्याने आदित्यच्या हुंडाई  कारची काच फोडून त्यातील 18 हजाराची रोख रक्कम व लॅपटॉप असलेली बॅग घेऊन पळ काढला. दररम्यान, जेवण झाल्यानंतर पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आदित्य  घरी जाण्यासाठी आईसह कारजवळ आल्यानंतर त्याच्या कारमधून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात केली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला कारावास

पनवेल : बातमीदार : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणार्‍या खांदा कॉलनी भागातील रूपेश फडके याला अलिबाग येथील विशेष सत्र न्यायाधीश व्ही. एन. मोहिते यांनी तीन वर्षे सश्रम कारावासाची व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना जानेवारी 2017 मध्ये घडली होती. या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी खांदा कॉलनी भागात राहण्यास असून आरोपी रूपेश फडके हादेखील त्याच भागात राहण्यास होता. 31 जानेवारी 2017 रोजी दुपारी आरोपी रूपेश याने पीडित मुलीला तळमजल्यावर बोलावून तिला जबरदस्तीने मिठी मारून तिच्यासोबत अश्लील चाळे केले होते. पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यानंतर त्यांनी रूपेश विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रूपेश फडके याच्यावर विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा करून त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुह्याचा तपास पूर्ण करून अलिबाग येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होती. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली, तसेच तपासी अंमलदार एस. यू. जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हामूनकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. त्यानंतर न्या. व्ही. एम. मोहिते यांनी आरोपी रूपेश फडके याला उपलब्ध साक्षी पुराव्यावरून दोषी ठरवत त्याला तीन वर्षे सश्रम कारावास, तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply