नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे शनिवार आणि रविवारी मुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये, तसेच पनवेल बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटलेली पहावयास मिळाली. बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असली तरी त्याचा परिणाम बाजारभावावर फारसा झाला नव्हता. ग्राहकांना आवश्यक तेवढा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
नवी मुंबईच्या बाजारात शुक्रवारी 1,873 वाहनांमधून कृषिमाल विक्रीसाठी आला होता. शनिवारी दिवसभरात फक्त 1,160 वाहनांचीच आवक झाली. माल कमी आल्यामुळे गर्दी नियंत्रणात आली असून, मुंबई व नवी मुंबईकरांना आवश्यक तेवढा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही सुरळीतपणे करण्यात आला आहे.
कडक निर्बंधांमधून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारास वगळण्यात आले होते, परंतु यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने व व्यापारी संघटनांनी सर्व व्यापार्यांना आवाहन करून शनिवारी आवश्यक तेवढाच माल मागविण्यात यावा. जास्त माल मागवू नये, असे आवाहन केले होते. पाचही मार्केटसाठी व्यापाराची नवीन नियमावली लागू केली होती. यामुळे सर्वच मार्केटमध्ये कमी आवक झाली. कांदा मार्केटमध्ये 107, भाजी मार्केटमध्ये 409, फळ मार्केटमध्ये 226, मसाला मार्केटमध्ये 107 व धान्य मार्केटमध्ये 311 वाहनांचीच आवक झाली होती.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. दिवसभर सुरळीतपणे व्यवसाय सुरू होता.
-संदीप देशमुख, सचिव, बाजार समिती