Breaking News

विमानतळाची 93% विकासपूर्व कामे पूर्ण

प्रकल्पबाधितांच्या स्थलांतराचे कामही अंतिम टप्प्यात

नवी मुंबई : सिडको वृत्त : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळ क्षेत्रातील विकासपूर्व कामे वेगाने सुरू असून सुमारे 93% कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, प्रकल्पबाधित गावांतील मंदिरांचे स्थलांतर, विमानतळ क्षेत्रात पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे या कामांनाही सिडकोतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील व  पनवेल तालुक्यातील उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर, वहाळ, चिंचपाडा, वरचे ओवळे, पारगाव, डुंगी, कोल्ही कोपर या दहा गावांतील जमीन संपादित करून आकारास येत आहे. सिडकोतर्फे जीव्हीके प्रणित नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या सवलतधारक कंपनीस विमानतळ उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विमानतळ क्षेत्रात एप्रिल, 2017 पासून सिडकोतर्फे विकासपूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. विकासपूर्व कामांमध्ये उलवे टेकडीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह वळविणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यांचा समावेश आहे. सिडको आणि सवलतधारक कंपनी यांच्यात झालेल्या नोव्हेशन करारानंतर विमानतळ गाभा क्षेत्राचे हस्तांतरण सिडकोतर्फे सवलतधारक कंपनीस करण्यात आले आहे. यामुळे सद्यस्थितीत गाभा क्षेत्रातील विकासपूर्व कामे सवलतधारक कंपनीमार्फत पार पाडण्यात येत आहेत. विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या स्थलांतराचे 85% काम पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पबाधितांना महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेले, देशातील सर्वोत्तम पुनर्वसन पॅकेज देऊ करण्यात आले आहे. सदर पॅकेज अंतर्गत प्रकल्पबाधितांना 22.5% योजने अंतर्गत जमिनीच्या मोबदल्यात पुनर्वसन आणि पुन:स्थापना  क्षेत्रात विकसित भूखंड देण्यात येत आहेत. तसेच प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाकरिता विमानतळा नजीकच्या क्षेत्रात पुष्पक नोड् हा सर्व पायाभूत, भौतिक व सामाजिक सुविधांनी युक्त असा नोड् सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजने अंतर्गत पुनर्वसन क्षेत्रात करण्यात येणारी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.  सदर गावांतील ग्रामस्थांच्या संस्कृती व परंपरांचा विचार करून मूळ गावांतील मुख्य मंदिरांचे बांधकाम करण्याकरिता पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात भाडेपट्ट्याने भूखंड व रु. 1 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकताच 1 जानेवारी, 2019 रोजी वरचे ओवळे गावातील ग्रामदैवतांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात पार पडला. उर्वरित गावांतील मंदिर उभारणीची कामेही वेगाने सुरू आहेत. विमानतळ परिसराजवळील गावांमध्ये पावसाळ्यात होणारी पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांविषयी केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन, पुणे यांना उपाययोजना सुचविण्याची विनंती सिडकोतर्फे करण्यात आली होती. सदर संस्थेतर्फे पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून उलवे नदीचा प्रवाह बदलणे, उलवे नदीच्या परिसराच्या संरक्षणासाठी बंधारा बांधणे, आम्र मार्गावरील पुलाचे रुंदीकरण, विमानतळाच्या दक्षिणेकडील राष्ट्रीय महामार्ग 4ब परिसरात ‘सरफेस ड्रेनेज सिस्टम’ उभारणे इ. उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. या उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सध्या सिडकोतर्फे सुरू आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेशाचा वेगाने विकास होणार आहे. तसेच मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपातील रोजगार निर्मिती होणार आहे. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply