कर्जत : प्रतिनिधी – नेरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण नेरळ हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशाने सील करण्यात आले आहे. नेरळपाठोपाठ कर्जत शहरातही खबरदारी म्हणून चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील पहिला रुग्ण नेरळमध्ये आढळला. त्यामुळे नेरळ सील करण्यात येऊन सर्व व्यवहार चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. सावधानता म्हणून कर्जत व्यापारी फेडरेशननेसुद्धा स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत कर्जत शहरातसुद्धा बंद पाळला जात आहे. या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मेडिकल स्टोअर्स सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उघडी ठेवावीत तसेच इमर्जन्सी वाटल्यास रुग्णांना औषधे द्यावीत, असे सूचित करण्यात आले आहे.
नेरळ व कर्जत शहरासह कशेळे, कळंब, कडाव आणि डिकसळ येथील व्यापार्यांनी स्वतः आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी (दि. 21) संपूर्ण कर्जत तालुका बंद होता.