राणाचे दमदार अर्धशतक
चेन्नई ः वृत्तसंस्था
सलामीवीर नितीश राणाचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय साकारला. कोलकाताने 188 धावांचे आव्हान दिले असताना हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 177 धावांपर्यंतच मजल मारता आली.
हैदराबादने सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात गमावले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (3) आणि वृद्धिमन साहा (7) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी जवळपास 10च्या सरासरीने धावा फटकावत हैदराबादच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या, पण बेअरस्टो माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांना कामगिरी उंचावता आली नाही. पांडेने नाबाद 61 धावा फटकावल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अब्दुल समदने नाबाद 19 धावा केल्या.
तत्पूर्वी, सलामीवीर राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने 6 बाद 187 अशी धावसंख्या उभारली होती. राणाने त्रिपाठीसह आक्रमक फलंदाजी करीत दुसर्या गड्यासाठी 93 धावा जोडल्या. त्याने 56 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 80 धावांची खेळी केली. मग आंद्रे रसेल (5) आणि कर्णधार इऑन मॉर्गन (2) हे अपयशी ठरल्यानंतर दिनेश कार्तिकने हाणामारीच्या षटकांत नाबाद 22 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : 20 षटकांत 6 बाद 187 (नितीश राणा 80, राहुल त्रिपाठी 53, दिनेश कार्तिक नाबाद 22; राशिद खान 2/24, मोहम्मद नबी 2/32) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकांत 5 बाद 177 (मनीष पांडे नाबाद 61, जॉनी बेअरस्टो 55; प्रसिध कृष्णा 2/35).